ना. नितेश राणे: नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा केला सत्कार..
⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्लेवासीय नागरिकांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी नवनिर्वाचित भाजपा टीमने पुढील पाच वर्षे क्रियाशील रहावे. जनतेचे प्रश्न सोडविणे हे तुमचे ध्येय असून संघटना वाढीबरोबरच घराघरात कमळ जाईल, अशा पद्धतीने एकदिलाने सर्वांनी काम करा. वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी निश्चितच निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी वेंगुर्ला येथे बोलताना दिली.
वेंगुर्ला नगरपरिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप गिरप व भाजपचे 16 नगरसेवक यांचा आज सोमवारी मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते तालुका भाजपा कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी ना. नितेश राणे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, राज्य सदस्य राजू राऊळ, मनवेल फर्नांडिस, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, सुजाता पडवळ आदी उपस्थित होते. यावेळी सुहास गवंडळकर, आकांक्षा परब यांच्यासह अन्य 15 नगरसेवक, शहरअध्यक्ष श्रेया मयेकर, प्रसाद गुरव, प्रशांत आपटे, राजू राऊळ यांचाही सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम ना. नितेश राणे, मनिष दळवी यांचा पप्पू परब यांच्याहस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
ना. नितेश राणे पुढे म्हणाले, आज शहरात विरोधकच शिल्लक नाही आहेत, हे मनिष दळवी, पप्पू परब, बाळू देसाई, राजू राऊळ यांनी सिद्ध करून दाखविले आहे.त्यामुळे सर्वांनी प्राधान्याने पक्ष ध्येय धोरणना समोर ठेऊन शहरात व तालुक्यात भाजपा वाढीसाठी क्रियाशील रहावे. सभाना उपस्थिती नुसार मूल्यमापन होऊन निधी वाटप होईल. त्यामुळे शहरातील ग्रामीण भागातील जनतेला जो विकास हवा आहे, त्यानुसार सतत क्रियाशील रहावे लागेल. जे पराभूत झाले आहेत व भाजपा वाढीसाठी क्रियाशील आहेत, त्यांना अगदी जिल्हास्तरावरील सुद्धा जबाबदाऱ्या दिल्या जातील. वेंगुर्ला शहरातील आरोग्याच्या सुविधा देणे ही आता माझी जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे. सेंटलुक्स हॉस्पिटलचा प्रश्न व दिलेला शब्द मी पूर्ण करणार आहे. दिलीप गिरप यांनी व भाजपा टीमने वेंगुर्ला शहरात रोजगारवाढीबरोबरच नवीन प्रकल्प आणण्यासाठी क्रियाशील राहून वेंगुर्ला शहर विकास 2.0 ची तयारी करा. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी मी तत्पर आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. रवींद्र चव्हाण, खा. नारायण राणे, ना. नितेश राणे, मनिष दळवी व सर्व पदाधिकारी व नागरिक यांच्यामुळे दुसऱ्यांदा भाजपाची सत्ता आणणे शक्य झाले. वेंगुर्ला नगरीचा परिपूर्ण विकास नागरिकांना अपेक्षित असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य व सातत्य आवश्यक आहे. वेंगुर्ला नगरपरिषद 150 वे वर्ष असून चार दिवसांचा पर्यटन महोत्सव राबवायचा असून त्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना वेंगुर्लेत आणणार, असे यावेळी बोलताना दिलीप उर्फ राजन गिरप यांनी बोलताना सांगितले. सत्काराबद्दल त्यांनी पदाधिकारी व नागरिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला शहरासाठी प्रचारासाठी दिलेला पूर्णवेळ विजयास सहाय्यशील ठरला. महेश सारंग, त्यांचे सहकारी व वेंगुर्ला भाजपा टीमचे योगदान विजयात महत्वाचे आहे. संघटनेची ताकद या निवडणुकीत दिसून आली. त्यामुळे जनतेच्या सेवेसाठी पूर्णवेळ द्या. ग्रामीण एरियातील पदाधिकारी यांनीही मेहनत घेतली. त्यामुळे पुढील कालावधीत तालुक्यातही " शत प्रतिशत भाजपा " साठीच प्रयत्नशील राहणार.
यावेळी पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, नितीन चव्हाण, नितीन परब, सातेरी देवस्थानचे मानकरी दाजी परब,कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, महेश प्रभुखानोलकर, अभि वेंगुर्लेकर, योगेश खानोलकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, गणेश माईणकर, रफिक शेख, तुषार साळगावकर, आदीसह शहरातील तसेच तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले. यावेळी पुढील जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकासाठी भाजपा सज्ज असल्याची ग्वाही बाळू देसाई यांनी आपल्या प्रास्तविक भाषणातून दिली. तर वेंगुर्ला भाजपच्या विजयाचे " किंगमेकर " हे ना. नितेश राणे हेच असल्याचे यावेळी पप्पू परब यांनी आभार व्यक्त करताना सांगितले.
