विजघर–दोडामार्ग राज्य मार्गावरील धोकादायक खोदकामाविरोधात रविकिरण गवस आक्रमक…

⚡दोडामार्ग ता.२९-: विजघर ते दोडामार्ग राज्य मार्गावर सुरू असलेले नियोजनशून्य व बेजबाबदार खोदकाम अपघातांना निमंत्रण देणारे असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष म. रविकिरण रामदास गवस यांनी दोडामार्ग तहसीलदारांकडे निवेदन सादर केले. २९ डिसेंबर रोजी दिलेल्या या निवेदनातून त्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्य राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असतानाही ट्रायल रोड अथवा डायव्हर्जनची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. रस्त्यावर बॅरिकेडिंग, सूचना फलक, रिफ्लेक्टर व सिग्नल लाईट्सचा पूर्ण अभाव असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना प्रचंड धोका निर्माण होत आहे, असे गवस यांनी नमूद केले.
या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, स्थानिक नागरिक, वृद्ध तसेच रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवा सातत्याने ये-जा करतात. मात्र सध्याच्या स्थितीत हा रस्ता वापरणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच PWD व IRC मानकांकडे दुर्लक्ष करून काम सुरू असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकाराची तातडीने चौकशी करून ट्रायल रोड तयार केल्याशिवाय काम थांबवावे, निष्काळजी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी रविकिरण गवस यांनी केली आहे. वेळीच कारवाई न झाल्यास भविष्यात घडणाऱ्या अपघातांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page