गुरांसाठी ठेवलेले गवत जळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान:दुसऱ्यांदा आग लागल्याने शेतकरी चिंतेत..
⚡सावंतवाडी ता.२९-: मळेवाड येथील पानाचे भोम (धनगर सडा)येथे आज दुपारी साडे बाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत येथील शेतकरी ग्रामस्थांचे बरेच नुकसान झाले.यात काजू झाडांचे,गुरांसाठी ठेवलेल्या गवताचे बऱ्याच प्रमाणात जळून नुकसान झाले. दुपारच्या सत्रात आग लागल्याने आग बरीच भडकलेली होती . ती विझविणे कठीणच झाले होते.सावंतवाडी येथून अग्निशमन दलाचा पाण्याचा बंब येईपर्यंत येथील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा अतोनात प्रयत्न सुरू केला मात्र आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने ती विझविणे कठीणच झाले.मात्र पाण्याचा बंब येताच तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न सुरू झाला.सायंकाळी उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता.मागील महिन्यात अशाच प्रकारची आग लागल्याने यात सुद्धा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.आता परत दुसऱ्यांदा आग लागण्याच्या प्रकारामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.मात्र यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
