हुमरमळा (वालावल) तील जलजीवनची कामे पैशांअभावी अपूर्ण…

ठेकेदारांचे पैसे न मिळाल्यास जि प सीईओ दालनात ठिय्या:ठाकरे सेनेच्या अतुल बंगे यांचा इशारा..

कुडाळ : हुमरमळा-वालावल गावातील जलजीवन योजनेंतर्गत काही कामे अपुर्ण राहीलेली आहेत. तसेच सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांचे पैसे अडकले असुन येत्या पंधरा जानेवारी पर्यंत अडकवलेले पैसे मिळाले नाहीत तर कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात अचानक ठाण मांडुन आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा संपर्क प्रमुख अतुल बंगे यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील जलजीवन पाणीपुरवठा कामे सुरू झाली, तशीच अती वेगाने हुमरमळा वालावल गावात सुध्दा ही कामे सुरु झाली. मोठा गाजावाजा करुन ही कामे घेण्यात आली आणि सुरू पण झाली. परंतु बरेच गरीब ठेकेदारांचे पैसे अडकुन आहेत. काही ठेकेदार आपल्या मौल्यवान वस्तू गहाण ठेवुन मटेरीयलवाल्यांचे व कामगारांचे पैसे दिले आहेत. तर काहींनी हातउसने घेऊन कामावर खर्च केले आहेत. अशांना जगणं कठीण झाले आहे. शासन आज देईल उद्या देईल या आशेवर ठेकेदार आहेत. परंतु शासन काही पैसे देण्याचे नांव काढत नाही. त्यामुळे लोकांनां पाणी नाही ते नाही पण ठेकेदार आपल्या आयुष्याची चिंता करत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी तरी यात लक्ष घालावे, अन्यथा आपण पंधरा जानेवारी नंतर केंव्हाही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठीय्या मांडणार असल्याचा इशारा शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा संपर्क प्रमुख अतुल बंगे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page