घारपी शाळेत वीर बाल दिवस उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.२६-: घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वीर बाल दिवस विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, त्याग व देशभक्तीची भावना रुजावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकांनी वीर बाल दिवसाचे महत्त्व विशद केले. अल्पवयातच धर्म व देशासाठी बलिदान देणाऱ्या साहिबजाद्यांचे शौर्य विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण म्हणून मांडण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी कविता गायन स्पर्धा व वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कविता गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध हावभावयुक्त कविता सादर केल्या. तर वादविवाद स्पर्धेत मोबाईलचे फायदे व तोटे,शहर व खेड्यातील जीवन, काय खावे व खाऊ नये, मुलगा व मुलगी एकसमान अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपले विचार मांडत विषयाची सखोल मांडणी केली.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण देशभक्तीमय झाले होते. मुख्याध्यापक जे. डी. पाटील आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते, असे सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page