प्रवाशांच्या गैरसोयीविरोधात हिंदु जनजागृती समितीने वेधले प्रशासनाचे लक्ष:लँडलाईन व मोबाईल क्रमांक तातडीने कार्यान्वित करण्याची केली मागणी..
⚡सावंतवाडी ता.२६-:
प्रवाशांना एस.टी. बस गाड्यांची अद्ययावत व अचूक माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक आगारात अधिकृत संपर्क क्रमांक देण्यात आलेले असतात. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे संपर्क क्रमांक वारंवार बंद असल्याचे, ‘आऊट ऑफ ऑर्डर’ असल्याचे किंवा संपर्क साधल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे.
ही समस्या तातडीने सोडविण्यासाठी एस.टी. आगार व नियंत्रण कक्षांचे किमान एक लँडलाईन आणि एक भ्रमणध्वनी क्रमांक तत्काळ कार्यान्वित करण्यात यावेत. तसेच हे सर्व अधिकृत संपर्क क्रमांकांची अद्ययावत सूची महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. प्रवाशांनी संपर्क साधल्यानंतरही प्रतिसाद न देणे ही बाब ‘सेवा त्रुटी’ मानून संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय दायित्व निश्चित करण्यात यावे, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीने सुराज्य अभियानाच्या अंतर्गत एस.टी. प्रशासनाकडे केल्या आहेत.
या संदर्भातील निवेदन कणकवली येथे एस.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक तसेच सावंतवाडी येथे प्रभारी (तात्पुरता कार्यभार असणारे) आगारप्रमुख यांना देण्यात आले. सध्या संपर्क व्यवस्थेअभावी एस.टी. बसगाड्यांची माहिती मिळविण्यासाठी प्रवाशांकडे कोणतेही विश्वसनीय साधन उपलब्ध नाही. याचा गंभीर परिणाम ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार तसेच आपत्कालीन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही परिस्थिती एस.टी. महामंडळाच्या विश्वासार्हतेला धक्का देणारी असून सार्वजनिक हिताला बाधा आणणारी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि प्रवाशी हित जपले जाणे आवश्यक असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.सावंतवाडी येथे प्रभारी आगारप्रमुख किरणकुमार यांना निवेदन देण्यात आले.
शयावेळी संपद दळवी, द्वारकानाथ वाडकर, दिलीप आठलेकर, राघोबा निब्रे, शंकर निकम आदी उपस्थित होते.
कणकवली येथे आगारप्रमुख अजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एस.टी. कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक, तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्यासह जयवंत सामंत, सुनील सावंत, सुनील घुगरे, मिलिंद पारकर, प्रदीप सावंत, मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.
