५० लाख ६६ हजारचा मुद्देमाल जप्त: काल साडेदहा वाजण्याच्या सुमारास केली कारवाई..
⚡बांदा ता.२६-: गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली (ता. सावंतवाडी) येथील तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणारा अंदाजे ५० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
इन्सुली तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता गोव्याहून महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू कंटेनर (क्र. GJ-17-XX-0871) ची तपासणी करण्यात आली.
तपासणी दरम्यान वाहनात लपवून ठेवलेली गोवा बनावटीची विदेशी मद्याची वाहतूक उघडकीस आली.
या कारवाईत १८० मि.ली. क्षमतेच्या प्रत्येकी ४८ सिलबंद प्लास्टिकच्या बाटल्यांनी भरलेले एकूण ६५० बॉक्स (३१,२०० बाटल्या) जप्त करण्यात आल्या.
या मद्याची अंदाजे किंमत ४० लाख ५६ हजार रुपये आहे. तसेच, अशोक लेलँड कंपनीचा चॉकलेट रंगाचा कंटेनर मालवाहू ट्रक (अंदाजे किंमत १० लाख रुपये) आणि एक अँड्रॉईड मोबाईल (अंदाजे १० हजार रुपये) असा एकूण ५० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.ही कारवाई इन्सुली तपासणी नाका येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.
