⚡कणकवली ता.२३-: सातारा येथील सेवा सामाजिक विकास संस्था यांनी सामाजिक क्षेत्रात राबवलेल्या प्रभावी व परिणामकारक कार्याची दखल घेत त्यांना सोशियो स्टार अवॉर्ड्स २०२५ अंतर्गत कौशल्य विकास पुरस्काराने गौरविण्यात आले. CSR HAT यांच्या वतीने मुंबईतील हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेंटल येथे हा मानाचा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. “Celebrating the Joy of Goodness” ही या पुरस्कार सोहळ्याची संकल्पना असून, समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
महाराष्ट्रभरातील सामाजिक, शैक्षणिक, कौशल्य विकास व महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यभरातून २०७ हून अधिक स्वयंसेवी संस्था, ५० CSR प्रमुख तसेच सुमारे २०० कॉर्पोरेट व NGO प्रतिनिधी उपस्थित होते. या मंचामुळे सामाजिक संस्था व कॉर्पोरेट क्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत झाली.
सेवा सामाजिक विकास संस्थेच्या वतीने संचालक युवराज भांडवलकर, विश्वस्त सुहास बेर्डे आणि सुश्री. ज्योती बेर्डे यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. युवक सक्षमीकरण, रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण, तसेच वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने सातत्याने राबवलेल्या उपक्रमांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यास ब्लू स्टार लिमिटेडच्या CSR प्रमुख सुश्री. अनेशा मजुमदार, आयआरएस डॉ. प्रशांत रोकडे (अतिरिक्त आयुक्त – CGST, मुंबई), महिंद्रा अँड महिंद्राचे बिझनेस हेड संजय क्षीरसागर, अँजेलो ग्रुपचे अध्यक्ष श्री. अॅग्नेलो अॅथाईड, वोलकार्ट फाउंडेशनचे CEO श्री. सिरील डेव्हिड, तसेच ITM स्किल्स युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. जयवंत शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सेवा सामाजिक विकास संस्थेने प्रोजेक्ट दिशा आणि प्रोजेक्ट सक्षम या महत्त्वाकांक्षी उपक्रमांच्या माध्यमातून बजाज फिनसर्व व महाराष्ट्र स्कूटर लिमिटेड यांच्या सहकार्याने युवती व युवकांसाठी रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण प्रभावीपणे राबवले आहे. सातारा येथील अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात संस्थेचे विविध उपक्रम सुरू असून, हॉस्पिटॅलिटी, कृषी, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास व रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रत्यक्ष (हँड्स-ऑन) प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण साधनांचा वापर, उद्योगजगताशी समन्वय आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांचा प्रभावी संगम साधत संस्था युवकांच्या दीर्घकालीन सामाजिक व आर्थिक विकासासाठी कार्यरत आहे. प्रशिक्षणानंतर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हा पुरस्कार केवळ संस्थेच्या कार्याचा गौरव नसून, सामाजिक परिवर्तनासाठी असलेल्या संस्थेच्या दृढ निष्ठेची पावती असल्याचे मानले जात आहे. या सन्मानामुळे सेवा सामाजिक विकास संस्थेला भविष्यात अधिक व्यापक स्तरावर युवक, महिला व वंचित घटकांसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
सेवा सामाजिक विकास संस्था कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम, आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण समाजनिर्मितीसाठी कार्यरत राहील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
