डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा आरोप करत ग्रामस्थांनी मृतदेह ठेवला रुग्णालयाच्या दरवाजावर..
⚡कणकवली ता.१४-:
डोक्यावरील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया कणकवलीतील खासगी रुग्णालयात पार पडल्यानंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याने कोल्हापूर येथे हलविण्यात आलेल्या १९ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी युवतीचा मृतदेह थेट संबंधित खासगी रुग्णालयाच्या दारात ठेवत तीव्र आंदोलन केले. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच युवतीचा नाहक बळी गेला असल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका युवतीच्या डोक्याला गाठ असल्याने तिला शुक्रवारी कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास युवतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर तिचा रक्तस्त्राव थांबत नसल्याने प्रकृती गंभीर बनली. अखेर तिला कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटेच्या सुमारास युवतीचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी युवतीचा मृतदेह घेऊन संबंधित खासगी रुग्णालयात धाव घेतली. कोणत्याही आवश्यक चाचण्या न करता शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळेच युवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने रविवारी दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास रुग्णालय व परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
