सिंधुदुर्गात वाळू परवाना प्रक्रियेला विलंब…

२५ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा डंपर वाळू व्यावसायिकांचा इशारा..

⚡सिंधुदुर्गनगरी ता १२-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदाच्या वाळू परवाना प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे डंपर व वाळू व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी असून २५ डिसेंबरपर्यंत लिलाव प्रक्रिया पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर उभे करून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा डंपर व वाळू व्यावसायिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

दरवर्षी ऑक्टोबरमध्ये वाळू परवाना प्रक्रिया पूर्ण होत असताना, यंदा मात्र १२ डिसेंबरपर्यंतही पुढील टप्प्याची कोणतीही कार्यवाही न झाल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत परवान्यांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या कालावधीत ५८ वाळू परवानाधारकांनी अर्ज दाखल केले असून सर्व प्रकरणे मंजूरही झाल्याची माहिती व्यावसायिकांकडून देण्यात आली. मंजुरीनंतर कामगार, डंपर, यंत्रसामुग्री यांची मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली. मात्र प्रक्रिया थांबल्याने आर्थिक चक्रच खुंटल्याची भावना संबधितांमध्ये आहे.
या निर्णयाचा फटका गवंडी, डंपर मालक–चालक, हार्डवेअर दुकानदार, लाकूड मेस्त्री, गॅरेज व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, घरकुल लाभार्थी, शासकीय ठेकेदार आणि बिल्डर्स यांना बसत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. “कामधंदे ठप्प झाले असून उपासमारीची वेळ येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशी प्रतिक्रिया व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आली.
२५ डिसेंबर २०२५ पर्यंत लिलाव प्रक्रिया पूर्ण करून वाळू परवाने जारी करावेत अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर उभे करून आंदोलन करू अशा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावेळी समीर कृष्णा दळवी, नित्यानंद शिरसाट, मिलिंद परब, राजेश प्रसादी, अभिषेक गावडे, धीरज परब, राजन वाळके आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page