आमदार दीपक केसरकर: लोकांच्या जमिनी बळकावणाऱ्यांनी पैशाचा वर्षाव करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरु केलाय; अशा लोकांना जागा दाखवा..
⚡सावंतवाडी ता.३०-:
शिरसिंग “धरणाचं काम बंद पडल्यावर मी कॅबिनेटमध्ये पाठपुरावा केला आणि तब्बल 640 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. ज्यांना सावंतवाडीची माहितीच नाही, ते सावंतवाडीसाठी काय करणार?” असा सवाल आमदार दीपक केसरकर यांनी केला.
ते म्हणाले शहरावर राज्य करण्यासाठी लँड माफियांचं राजकारण सुरू असून सावंतवाडीचे नागरिक हे कधीही सहन करणार नाहीत. “लोकांच्या जमिनी बळकावणाऱ्यांनी पैशाचा वर्षाव करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अशा प्रवृत्तीला शहरात शिरकाव होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
“या शहराने मला चार वेळा सलग आमदार म्हणून निवडून दिलं. सावंतवाडीनेच मला सर्वाधिक मतांची लीड दिली आहे. हे शहर माझं घर आहे आणि त्यावर कोणत्याही परिस्थितीत माफियांचा कब्जा होऊ देणार नाही,” असा निर्धार केसरकर यांनी व्यक्त केला.
सावंतवाडीच्या परंपरा, संस्कृती आणि सौहार्द जपण्याची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. “गेल्या ३० वर्षांत नगरपालिकेत आमच्या सत्ताकाळात एकही दंगल झालेली नाही. सावंतवाडीची शांतता हेच इथलं वैशिष्ट्य आहे,” असे ते म्हणाले.
महायुतीबाबत स्पष्टीकरण देताना आमदार म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकत्र असूनही सावंतवाडीत विरोधकांनी कटकारस्थान करून वेगळी भूमिका घेतली. “विरोधी पक्षाला दिलेलं मत म्हणजे भाजपलाच मत दिल्यासारखं आहे. नागरिकांनी भ्रमात पडू नये,” असे आवाहन त्यांनी केले.
