मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण ; पोलीस घटनास्थळी दाखल..
कणकवली : शहरातील कनकनगर परिसरातील परबवाडी येथे पाण्याच्या टाकीजवळ एका तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज सकाळी सुमारे ११:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पाण्याच्या टाकी परिसरात कुजलेल्या मृतदेहाचा वास येऊ लागल्याने येथील टाकीवरील कामगाराने परिसराची पाहणी केली. त्यावेळी पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसून आला. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच पोलिस पथक दुपारी सुमारे १२:४५ वाजता घटनास्थळी दाखल झाले. शहरातील किरकीची कोंड परिसरात ही घटना घडली असून मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही.
सदर मृत्यू अपघाती आहे की घातपात, याबाबत विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. आढळून आलेला मृतदेह हा नदीकाठच्या खोलगट भागाबरोबर असल्यामुळे बाहेर काढणे अडथळा निर्माण होत होता. मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, हवालदार शिंदे, कॉन्स्टेबल सचिन माने, सागर जाधव, नगरपंचायत चे प्रशांत राणे, उत्तम पुजारे यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
