⚡सावंतवाडी ता.२८-: मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी या प्रशालेमध्ये ज्युबली कप 2025 च्या अनुषंगाने आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यातून खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांना शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनी सन्मानपूर्वक मंचावर घेऊन येत तदनंतर ध्वजारोहण ,राष्ट्रगीत व शालेयगीत तसेच विशेष प्रार्थना अशा प्रकारे कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ सिंधुदुर्ग डायसेशनचे रे. फादर अँड्रू डिमेलो ,प्रमुख पाहुणे म्हणून सुपिरिअर ऑफ मिलाग्रीस बोर्डिंग सावंतवाडी माजी प्रोविन्शियल कापूचीन, असिस्टंट पॅरिस प्रिस्ट ऑफ मिलाग्रीस कॅथेड्रल सावंतवाडीचे रे.फादर अमृत तसेच अन्य मान्यवरांमध्ये युथ डायरेक्टर आणि सोशल सेंटर सावंतवाडीचे रे.फादर कॅजिटन डांटस आदी उपस्थित होते .
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह व प्रेमाचे प्रतीक म्हणून रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी मशाल प्रज्वलित करून मिलाग्रीस हायस्कूलचा शालेय कबड्डी या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड झालेला सुशोभन सावंत तसेच करण कासरलकर विभाग स्तरावर गोळाफेक प्रकारात सहभागी झालेला खेळाडू तसेच अन्य संघातील खेळाडू यांच्या सर्वांच्या साक्षीने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते क्रीडा ज्योत पेटवत संपूर्ण मैदानामध्ये प्रदक्षिणा घालून नियोजित ठिकाणी क्रीडाज्योत ठेवण्यात आली. यानंतर सर्व खेळाडूंसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना यांनी क्रीडाविषयक प्रतिज्ञा घेतली .
उपस्थित खेळाडूंसाठी नृत्यविष्काराचे सादरीकरण शिक्षिका रोजा फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.यानंतर रे. फादर अँड्रू डिमेलो यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना यांनीही आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करीत उपस्थित सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .
यानंतर उपस्थित मान्यवर रे. फादर अँड्रू डिमेलो यांच्या शुभ हस्ते फीत कापून तसेच फुगे व रंगीत मेणबत्तीच्या या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले व त्यानंतर सर्व सहभागी संघातील प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांना सन्मानचिन्ह तसेच टी-शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये डॉजबॉल,कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल इत्यादी खेळांचा समावेश होता. यात विविध जिल्ह्यातून एकूण नऊ शाळा सहभागी झाल्या होत्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या सर्व खेळांमध्ये सहभाग घेत ज्युबली कप 2025 मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षिका असुप्तीना माडतीस यांनी केले.
या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्यास सिस्टर ज्योती नलमाला मुख्याध्यापिका सेंट फ्रान्सिस झेवियर इंग्लिश मीडियम स्कूल, आजगाव तसेच सिस्टर जॉयलेट परेरा सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल रत्नागिरी व फादर जो आदी उपस्थित होते. सोहळ्या दरम्यान सर्व संघातील विजयी व उपविजयी संघांना मेडल्स व ज्युबली कप देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच अंतिम निकालामध्ये सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मिलाग्रीस हायस्कूल च्या सर्व संघांना ज्युबली कप 2025 उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी खेळाडूंना खेळाच्या माध्यमातून आपल्यामध्ये असलेल्या नेतृत्व शक्तीला जागे करण्यासाठी आवाहन बिशप अल्विन बरॅटो यांनी केले केले. प्रशालेचे मुख्याध्यापक रे . फादर रिचर्ड सालदाना यांनी उपस्थित सर्व संघांचे प्रशिक्षक , संघ व्यवस्थापक, संघनायक यांचे मनस्वी अभिनंदन केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोविना पिंटो यांनी केले.
