प्रभाग सातमध्ये परिवर्तनाची घोषणा; हुले–गावकर यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२८-: मालवण शहरातील प्रभाग सात मध्ये बाजारपेठ व मेढा असे महत्वाचे परिसर असून आजही या प्रभागातील मूलभूत सोयी सुविधांबाबतच्या समस्या सुटलेल्या नाही. या प्रभागातून गेली तीस वर्षे सतत पक्ष बदलून लोकप्रतिनिधी राहिलेल्या मंडळींनी फक्त आपला विकास साधण्याचे काम केले आहे. त्यामुळे या प्रभागात परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने नगरपालिका निवडणुकीत आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण प्रभाग सातमधून शिंदे शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवर फडकविण्याचा निर्धार मतदारांनीच केल्याचा दावा शिंदे शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार नरेश हुले आणि मेघा गावकर यांनी केला आहे.

मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी महत्वाच्या अशा प्रभाग सात मधून शिंदे शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी फ्रेश चेहरे असलेल्या नरेश हुले आणि मेघा गावकर यांना संधी दिली आहे. हुले व गांवकर यांच्याकडून प्रभागात जोरदार प्रचार सुरु असून प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे हुले व गांवकर यांनी सांगितले. या प्रभागातून यापूर्वी प्रतिनिधीत्व करणारे मालवण शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, उद्योजक बाळू तारी, सौ. स्वप्नाली नेरुरकर अशा तीन बड्या व्यक्तींची साथ यावेळी शिंदे शिवसेनेच्या पाठिशी उभी आहे. यामुळे प्रभागातून मोठ्या प्रमाणात हुले आणि गावकर यांनी प्रचारात आघाडी घेतलीय, असे सांगण्यात आले.

नरेश हुले यांचा मेढा विभागात दांडगा जनसंपर्क आहे. सामाजिक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच त्यांचे योगदान असते. मासेमारी आणि मत्स्य उद्योजक अशा दोन्ही विभागात त्यांचे काम असल्याने मच्छीमारांच्या समस्यांचीही त्यांना जाण आहे. मतदारसंघातील मूलभूत समस्या कायम असल्याने त्या सोडविण्यासाठी आपण लढत असून मतदारांचा मिळणारा पाठिंबा समाधान देणारा आहे, या प्रभागात परिवर्तनाच्या दृष्टीने जनता मला नगरसेवक म्हणून निश्चित संधी देईल, असा विश्वास नरेश हुले यांनी व्यक्त केला आहे.

मालवण बाजारपेठेतील एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून ख्याती असणाऱ्या मेघा गावकर यांचे घराणे उद्योग व्यवसायाबरोबरच राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहे. राजकीय वारसा असलेल्या गावकर यांनी अनेकांना रोजगार मिळवून देणारा हॉटेल व्यवसाय स्वतःच्या हिमतीवर आणि ताकदीवर उभा केला आहे. त्यांना कुटुंबातूनच समाजकारण करण्याचे धडे मिळाल्याने प्रभागातील अनेक शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. प्रभागातील कोणत्याही व्यक्तीवर कसलाही प्रसंग ओढवला तर गावकर या सर्वांत पुढे असतात. एक लढवय्यी म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या उमेदवारीमुळे शिंदे शिवसेनेची मजबूत ताकद प्रभागात दिसत आहे. या दोघांच्या विजयासाठी माजी नगरसेवक उमेश नेरुरकर आणि बाळू तारी यांनी कंबर कसली असल्याने प्रचारात मोठ्या संख्येने मतदार सहभागी होत आहेत. प्रभाग सातमधून शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर यांनाही मोठे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा शिंदे शिवसेनेने केला आहे.

मालवण बाजारपेठ आणि मेढा विभागात पसरलेला प्रभाग सात हा मूलभूत समस्यांचे आगार बनला आहे. याठिकाणी बंदिस्त गटार व्यवस्था, कचऱ्याच्या समस्या, नादुरुस्त रस्ते, सतत बंद असलेले पथदीप, मोकाट गुरे-कुत्रे यामुळे या प्रभागात नागरिकांच्या आरोग्याचाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रभाग सातमध्ये काढलेल्या प्रचार रॅलीला मिळत असलेला उत्साह आणि गर्दी पाहून विरोधकांची लढाई संपल्याप्रमाणे असल्याची प्रतिक्रियाही हुले व गावकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page