संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य जाणून घ्या – ऍड. संग्राम कासले…

⚡मालवण ता.२७-: भारतातील नागरिकांचे अस्तित्व हे भारतीय संविधानामुळे आहे. त्यामुळे भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य प्रत्येक भारतीय नागरिकांनी जाणून घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन ऍड. संग्राम कासले यांनी भंडारी ए. सो. हायस्कूल येथे संविधान दिन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए सो हायस्कूल येथे संविधान दिनानिमित्त भंडारी हायस्कूल, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व बार्टी यांच्यावतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एड. संग्राम कासले हे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापक हनुमंत तिवले, आर.डी बनसोडे आदि उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी आर. डी बनसोडे यांनी प्रास्ताविकात भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली.
याप्रसंगी बोलताना ऍड. संग्राम कासले म्हणाले, भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार असे महत्त्वाचे अधिकार दिले आहेत. याच अधिकारांमुळे भारतीय नागरिकांचे जीवन अतिशय सुसह्य बनले आहे. भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांबरोबर कर्तव्य देखील दिली आहेत. या कर्तव्याचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांची आहे. त्यासाठी शाळेतील शिक्षक व पालकांनी मुलांना संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य यांची माहिती करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाविषयी आदर व सन्मानाची भावना निर्माण होण्यास मदत होईल.
यावेळी भंडारी हायस्कूलच्या वतीने संग्राम कासले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आर.डी. बनसोडे यांनी मानले.

You cannot copy content of this page