घाणेरडे राजकारण करून माझ्यावर केलेली कारवाई निंदनीय…

विजय केनवडेकर:माझ्याकडेही सर्वांच्या कुंडल्या, कोणाला सोडणार नाही, केनवडेकर यांचा इशारा..

⚡मालवण ता.२७-:
आम. निलेश राणे यांनी घाणेरडे राजकारण करीत माझ्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून केलेली कारवाई अतिशय निंदनीय आहे. सापडलेले पैसे हे माझ्या केके कन्स्ट्रक्शन कंपनीतील आहेत. गेली अनेक वर्षे मी भाजपचा समर्पित कार्यकर्ता असून माझ्यावर कधीही भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही. मी कधीही अनधिकृत मार्गाने पैसे मिळवले नाही. मात्र, निलेश राणे यांच्या कृतीने संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या बद्दल वेगळे वातावरण निर्माण केले गेले असून माझे कुटुंब आज दहशतीखाली जगत आहे. आम. निलेश राणे यांच्या या कृती विरोधात मी कायदेशीर मार्गाने लढा देणार आहे. यात माझे बलिदान गेले तरी चालेल, मी कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, मी कोणाला भीक घालत नाही, इतरांच्याही कुंडल्या माझ्याकडे आहेत, असा इशारा विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

आम. निलेश राणे यांनी काल भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकल्यावर सुमारे २० लाख रुपयांच्या नोटा भरलेली बॅग सापडून आली होती. हे पैसे मालवण निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणले गेले होते, असा आरोप आम. निलेश राणे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. आपण केनवडेकर परिवार म्हणून ही पत्रकार परिषद घेत असून भाजपशी त्याचा संबंध जोडू नये, असे यावेळी विजय केनवडेकर यांनी सांगितले.

यावेळी विजय केनवडेकर म्हणाले, गेली ८० वर्षे माझे कुटुंब मालवणात राहत असून आम्ही व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून तसेच समाज कार्यात कार्यरत आहोत. मी राष्ट्रीय सेवक संघाचा आणि भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या सोबत आपण विविध स्तरावर आणि विविध विभागात काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही मला नेहमी वडिलांप्रमाणे साथ लाभली. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याचे विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात माझा मोठा वाटा आहे. नारायण राणे यांच्या पहिल्या निवडणुकीत भाजपकडून प्रचार प्रमुख मीच होतो. भाजपामध्येच नारायण राणे व आम.निलेश राणे यांच्या सोबत काम करताना या दोघांचाही माझ्यावर खूप विश्वास होता. आम. निलेश राणे यांच्यावर माझा वैयक्तिक कोणताही राग नाही, मात्र त्यांनी केलेल्या कृतीचा मला राग आहे. त्यांचे कान कोणी फुंकले हे पण मला माहित आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून माझ्यावर केलेली कारवाई निंदनीय आहे, असेही केनवडेकर म्हणाले.

आम. निलेश राणे यांनी माझ्या घराच्या परिसरात, घरात आणि बेडरूममध्ये कार्यकर्ते व कॅमेरे घेऊन अनधिकृतपणे प्रवेश केला. माझ्या घरात सापडलेले पैसे हे माझ्या केके कन्स्ट्रक्शन कंपनीतील आहेत. या कंपनीद्वारे शहरात एका बिल्डिंगचे काम सुरु असून त्याच्या विविध खर्चासाठी लागणारे पैसे देण्यासाठी ही रक्कम ठेवली होती. हे पैसे माझे नातेवाईक व मित्रांकडून घेतलेले होते. निवडणुकीत पैसे देताना- घेताना सापडले तर तक्रार करायची असते, मी काही निवडणुकीतील उमेदवार नाही, प्रचार यंत्रणेतील माझ्याकडे पद नाही, मी फक्त रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता म्हणून कारवाई करायची हे चुकीचे आहे. सापडलेली रक्कम माझ्या कंपनीतील होते हे मी सर्व पुराव्याशी सिद्ध करून शकतो. याबाबत मी कायदेशीर लढा देणार आहे, असेही विजय केनवडेकर म्हणाले.

घाणेरडे राजकारण करून माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. माझे वडील व मी गेली ७५ वर्षे जी तपश्चर्या केली त्याला तडा देण्याचे काम आम. निलेश राणे यांनी केले आहे. झालेल्या प्रकाराने माझे कुटुंब दहशतीखाली आहे. आजही माझ्या घराच्या परिसरात आमच्यावर लक्ष ठेवला जात आहे. पण मी हे प्रकरण निभावून नेणार कारण मी प्रामाणिक आहे. मी स्वार्थी किंवा पक्ष बदलू नाही. मलाही प्रलोभने आली, मात्र मी भाजप सोडली नाही. माझ्यावर कितीही दबाव आणा, कितीही खच्चीकरण करा, मी मरेपर्यंत भाजपचा समर्पित कार्यकर्ता म्हणून काम करतच राहणार, माझ्या व्यवसायाच्या कोणी आड येऊ दे, माझ्याकडेही सर्वांच्या कुंडल्या आहेत, काय ते करा, कोणाला सोडणार नाही, असा इशारा यावेळी केनवडेकर यांनी दिला.

You cannot copy content of this page