व्हिजन आणि भारतीय जनता पार्टीचे बळ आमच्याकडे असल्याने आमचा विजय निश्चित…

विशाल परब: आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक हे नॉन करप्टच असतील कुठल्याही ठेकेदाराकडून एक रुपये घेणार नाही..

⚡सावंतवाडी ता.२७-: व्हिजन आणि भारतीय जनता पार्टीचे बळ आमच्याकडे असल्याने आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला आहे. नुसती सत्ता मिळविणे हा उद्देश नसून २१-० असा विजय मिळवणे हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना परब म्हणाले, “आमची स्पर्धा कोणाशी नाही. आम्ही कशी उत्तम सावंतवाडी उभी करू यासाठी आमची तयारी आहे. सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करत भारतीय जनता पार्टीला प्रचंड मतांनी विजय मिळवून द्यावा.”

ते पुढे म्हणाले की, सावंतवाडी राजघराण्याने शहरासाठी भरीव कामे केली असून हॉस्पिटल, मोती तलाव यांसह अनेक सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे मतदारांनी त्याचा विचार करावा. “आजपर्यंत सावंतवाडी शांततेचे शहर राहिले आहे आणि यापुढेही तसेच राहणार,” असेही त्यांनी सांगितले.

नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आल्यावर कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार होणार नाही, अशी ग्वाही देत परब म्हणाले,
“सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनतेत राहूनच काम करतील. एक टक्का कमिशन देखील घेतले जाणार नाही.”

शहरातील अस्तित्वात असलेल्या समस्या तीन डिसेंबरनंतर प्राधान्याने मार्गी लावू, असा शब्दही त्यांनी दिला. “आम्ही टीका राजकारण करणार नाही. फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलू आणि विकासाच्या आधारावर काम करु,” असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page