दत्ता सामंत:रोकड प्रकरणाची चौकशी व्हावी..
⚡मालवण,ता.२७-:
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरात काल मोठी रक्कम आढळून आली. या सापडलेल्या रकमेची चौकशी संबंधित यंत्रणेने करावी, अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली होती. मात्र, यावर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी जे उत्तर दिले, त्यावरून ते स्वतःला न्यायाधीश समजत आहेत काय, असा सवाल शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
मालवण येथील शिंदे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, राजन परुळेकर, दीपक पाटकर उपस्थित होते
श्री. सामंत म्हणाले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या कथित खोट्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा न्यायप्रविष्ट असतानाही भाजप जिल्हाध्यक्षांनी तो निकाली काढल्याचा दावा केला आहे. हा मुद्दा भाजपला पटला असेलही, पण तो मतदारांना पटला आहे का? असा प्रश्न सामंत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय आमदार निलेश राणे यांनी न्यायालयात नेला आहे. तो विषय न्यायप्रविष्ट असतानाही भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी तो निकाली काढल्याचे वक्तव्य केले आहे. हा विषय न्यायप्रविष्ट असतानाही भाजपचे जिल्हाध्यक्ष हा प्रश्न कालच निकाली काढतात, याचा अर्थ ते न्यायाधीश पदी बसले आहेत असा संदेश देण्यासारखा आहे. प्रत्यक्षात लोकांना कायद्यावर आणि न्यायावर विश्वास आहे, म्हणूनच आमदार निलेश राणे कागदपत्रांबाबत न्यायालयात गेले आहेत,” असे सामंत म्हणाले. भाजप जिल्हाध्यक्ष हे न्यायाधीश आहेत काय? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. दोन भिन्न मुद्द्यांची सरमिसळ करून ठामपणे काही सांगणे हे केवळ अभिनय करण्यासारखे असून, मतदार जनता हे चांगल्या प्रकारे जाणते, असेही सामंत यांनी ठणकावून सांगितले.
काल भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात जी मोठी रक्कम आढळून आली. त्याबाबत आमदार निलेश राणे यांनी निवडणूक यंत्रणेने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. हे काम यंत्रणाच करेल, असे सामंत म्हणाले.
आमदार निलेश राणे सुसंस्कृत आहेत. त्यांनी अर्वाच्च भाषेत न बोलता पोलिसांना आणि प्रसार माध्यमांना बोलावून पैशाची बॅग दाखवून दिली. पैसा सापडल्यानंतर जे भाजपचे पदाधिकारी तिथे दिसले, ते फ्लॅटचे पैसे द्यायला गेले होते की त्यांचा चालक रूम घ्यायला गेला होता, याचा खुलासा भाजप जिल्हाध्यक्षांनी करायला हवा होता. ते पदाधिकारी नेमके कशासाठी गेले होते तसेच ते आढळून आलेले पैसे कसले आहेत, हे जनतेला माहीत आहे. या सर्व घडामोडीनंतर आमदार निलेश राणे यांना चक्रव्यूहात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचे काम आणि व्हिजन जनतेला माहीत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढवत आहोत. भाजप जिल्हाध्यक्षांनी अशा गोष्टी करू नयेत. सत्तेत बहुमतात असल्याचा गैरसमज कोणी करून घेऊ नये आणि सत्तेत असला म्हणून कोणालाही धमकी देऊ नये,” असे सामंत म्हणाले. राज्यात भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे हे महायुतीचे घटक आहेत. त्यामुळे तत्वाने भांडले पाहिजे.
आमदारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जनतेने शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवकांना निवडून देत पालिकेवर भगवा फडकवावा,” असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.
