⚡मालवण ता.२६-:
मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज रात्री सात वाजण्याच्या सुमारास मालवण बाजारपेठेतील एका भाजपा कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात आपल्या कार्यकर्त्यांसह जात धाड टाकली. या धाडीत आम. निलेश राणे यांना खोलीतील एका कॉटवर लाखो रुपयांनी भरलेली पैशाची बॅग आढळून आल्यानंतर त्यांनी मालवण नगरपालिका निवडणुकीत निर्णय अधिकारी आणि मालवण पोलिसांना माहिती देत त्यांना घटनास्थळी पाचारण केले. आम. राणे यांनी ही धाड टाकताना फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाचा आधार घेत थेट चित्रीकरण करत विजय केनवडेकर यांच्या घरात भाजपा कार्यकर्त्याने आणून दिलेले हे पैसे मतदारांना वाटप करण्यासाठीच आणले होते असा आरोप करीत खळबळ उडवून दिली
दरम्यान भाजपा पदाधिकारी विजय केनवडेकर यांनी आपल्या घरात सापडलेले पैसे हे बांधकामासाठी आणले होते असा खुलासा आमदार निलेश राणे यांच्या समोर केला आहे.
श्री केनवडेकर यांच्या घरी धाड टाकल्यानंतर आम. निलेश राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, काल पासून भाजप कडून अतिशय वेगाने पैसे वाटपाची प्रक्रिया सुरु झाली आहे. आज मी पूर्ण तयारीनीशी धाड टाकली आहे. भाजपा कार्यकर्त्यांना पळायला संधी नव्हती. विजय केनवडेकर यांच्या घरी सुमारे २० ते २५ लाख रुपये भरलेली बॅग सापडली. हे पैसे त्यांच्या घरी काय करत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही निवडणुका लढविणार आहात काय? मैदानात उतरून लढा. जिल्ह्यात अशा निवडणुका यापूर्वी लढवल्या जात नव्हत्या. वातावरण गढूळ केले जात आहे. यांना विकास नाही, हेच प्रकार करायचे आहेत. निवडणुकीला पाच – सहा दिवस राहिले असताना रोज बॅगा पोच करण्याची यांची यंत्रणा आहे. अशी निवडणुक लढवून हे जिंकणार नाहीत, आणि जिंकले तरीही हे नगरपालिकेत ते पैसे पुन्हा लुटायला जातील, शहराला खड्ड्यात टाकतील. धाड टाकून देखील विजय केनवडेकर यांच्या चेहऱ्यावर घमेंड दिसत होती, ही घमेंड पैशाची आहे. पोलीस व निवडणुक यंत्रणेने या प्रकरणाचा सखोल तपास करून कारवाई करावी, असेही आम. राणे म्हणाले.
