दंडात्मक कारवाईमुळे वाहनधारकांत संताप ..
⚡आंबोली, ता.२६-: आंबोली–नांगरतास मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांवर स्पीड लिमिटच्या कारणावरून दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याने नागरिक व पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीत प्रवेश केल्यानंतर कोणतेही वेगमर्यादा (स्पीड लिमिट) दर्शविणारे फलक लावण्यात आलेले नाहीत, असा आरोप वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
या मार्गावर हायवे वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित असताना जिल्हा पोलिसांकडून दंड आकारला जात असल्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे. स्पष्ट सूचना फलक नसताना थेट दंडात्मक कारवाई केल्यामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे.
आठ दिवसांपूर्वी पुणे येथील एका रायडरचा अरुंद रस्त्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. तसेच आजरा ते सिंधुदुर्ग हद्दीदरम्यान एकही वेगमर्यादा फलक नसल्याचे सांगितले जात आहे. या अपघातप्रवण ठिकाणी दर आठवड्याला गंभीर अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.अपघात रोखण्यासाठी आवश्यक ते वेगमर्यादा व इशारा फलक तात्काळ लावावेत, रस्त्यालगत वाढलेली झाडी छाटावी, तसेच वनव्यवस्थापन व बांधकाम विभागाने जबाबदारी स्वीकारून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.फक्त दंडात्मक कारवाई करून अपघात टाळले जाणार आहेत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत असून संबंधित विभागांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
