देशाची एकता आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवूया…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:कुडाळ शहरात एकता पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ : स्वातंत्र्यानंतर देश एकत्र आणण्याचे खूप मोठे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. जात, धर्म, भाषा, प्रांत याच्याही पलीकडे जाऊन आपण आपली एकता आणि स्वातंत्र्य कायम टिकवून ठेवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. ‘मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय युनिटी मार्च म्हणजेच एकता पदयात्रा कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी कुडाळ येथे त्या आज बोलत होत्या.
युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत सन २०२५ हे वर्ष भारताचे लोहपुरुष राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती वर्ष म्हणुन साजरे केले जात आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधुन राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान संपुर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत. ‘मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत या जिल्हास्तरीय युनिटी मार्च म्हणजेच एकता पदयात्रेचे आज सकाळी कुडाळ शहरात आयोजन करण्यात आले होते. कुडाळ हायस्कुलच्या मैदानावरून या पदयात्रेची सुरुवात झाली. तत्पूर्वी या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. यावेळी व्यासपीठवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, मेरा युवा भारतचे उपसंचालक कालिदास घाटवळ, जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) श्रीमती कविता शिंपी, क्रीडा अधिकारी श्रीमती अडसूळ, जिल्हा पुरवठा अधीकारी श्रीमती सहारे, कामशिप्र मंडळाचे पदाधिकारी अरविंद शिरसाट, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, भारताचे लोहपुरुष राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती वर्ष म्हणुन साजरे केले जात आहे.३१ ऑक्टोबर रोजी आपण त्यांची जयंती साजरी केली. त्या निमित्ताने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कुडाळ शहरातून युनिटी मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या निमित्ताने देशाची एकता टिकवून ठेवण्याचा संदेश आपण देत आहोत. कारण स्वातंत्र्यानंतर देश एकत्र आणण्याचे खूप मोठे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. हि एकता आणि हे स्वातंत्र्य आपण टिकवून ठेवले पाहिजे. जात, धर्म, भाषा, प्रांत याच्याही पलीकडे जाऊन आपण आपली एकता कायम टिकवायची आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत देखील हाच संदेश पोचविण्यासाठीच हि एकता पदयात्रा काढण्यात येत आहे. असे सांगून जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी या नियोजनात सक्रिय सहभागाबद्दल मेरा भारत युवा केंद्र, शिक्षण विभाग, एनएसएस, एनसीसी यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेरा युवा भारतचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांनी करून या एकता मार्चच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. सुरुवातीला बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था आणि चिमणी पाखर डान्स अकादमी यांच्या मार्फत देशीभक्तिपर गीतांवर नृत्य सादर करण्यात आली. प्रांताधिकारी ऐश्वर्या कालूशे यांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी एकतेचे प्रतीक असलेले फुगे अवकाशात सोडले. त्यांनतर त्यांनी हिरवा झेंडा दाखवून एकता पदयात्रेला मार्गस्थ केले. या पदयात्रेत प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतच कुडाळ हायस्कुल, कुडाळ हायस्कुल ज्युनियर कॉलेज, इंग्रजी माध्यम शाळा, बॅ नाथ पै शिक्षण संस्था, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी, स्काऊट, गाईड विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कुडाळ हायस्कुल, पोलीस स्टेशन, मुख्य मार्ग, एसटी बस स्थानक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हॉटेल गुलमोहोर, बाजारपेठ या मार्गाने हि पदयात्रा काढण्यात आली. कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर येऊन या पदयात्रेची सांगता झाली. युनिटी मार्चच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता, सामाजिक समरसता आणि युवक शक्तीचा जागर घडविण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. प्रा. एस. टी. आवटे यांनी केले.

You cannot copy content of this page