खेळ साहस, धैर्य आणि चिकाटीचे शिक्षण देतो…

रणजितसिंग राणे :बॅ नाथ पैकी शिक्षण संस्थेत वार्षिक क्रीडा स्पर्धाना सुरुवात..

⚡कुडाळ ता.२२-: खेळ साहस, धैर्य आणि चिकाटीचे शिक्षण देतो. खेळात चुरस निर्माण होते. खिलाडूवृत्ती वृद्धिंगत करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे खेळ होय. खेळामधील कसरतीमुळे शारीरिकते बरोबरच मानसिक आरोग्य चांगले राहते. क्रीडांगणातील संघ भावना जीवनात सामाजिक समयोजनाची शिकवण देते. असे प्रतिपादन निवृत्त वन अधिकारी रणजीतसिंग राणे यांनी केले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे दीप प्रज्वलन करून व हॉकी खेळाचे जादूगार ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.तसेच क्रीडा ज्योत रणजीतसिंग राणे यांच्या हस्ते प्रज्वलन करून ती विविध खेळांमध्ये विशेष प्राविण्यप्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर पालकांच्या वतीने संतोष वालावलकर बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य कल्पना भंडारी, बॅ. नाथ पै महिला आणि रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बॅरिस्टर नाथ पै फिजीओथेरपीचे प्राचार्य डॉ.प्रत्युष रंजन बिस्वाल, बॅरिस्टर नाथ पै बी. एड.कॉलेजचे प्रा. नितीन बांबर्डेकर, पल्लवी कामत, क्रीडा शिक्षक रोहिदास राणे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणजितसिंग राणे म्हणाले, शालेय जीवनापासून कोणत्याही क्रीडा प्रकारातील सहभाग प्राविण्य आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहण्याचा मूलमंत्र ठरतो. एवढेच नव्हे तर शैक्षणिक ताण-तणावर क्रीडांगणातील आपला वावर मानसिक बळ देतो. म्हणून आपली क्षमता व कुवत पाहून खेळाची निवड करा व त्यात समरसून सहभाग नोंदवा. असे सांगितले. तसेच उमेश गाळवणकर यांच्यासारख्या उज्ज्वल शैक्षणिक व्हीजन घेऊन काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये आपण शिक्षण घेत आहात. ही फार भाग्याची गोष्ट आहे. त्याचा यथोचित लाभ घ्या. असे सांगत क्रीडा स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सुरेख क्रीडा संचलनाने, विद्यार्थ्यांच्या क्रीडा डान्सने, आकाशात फुगे सोडून दिमाखदारपणे क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. तसेच कबड्डी या खेळाची मान्यवरांच्या हस्ते टॉस उडवून क्रीडा प्रकारांच्या स्पर्धेला सुरुवात झाली. अतिशय खिलाडू वृत्तीने खेळीमेळीच्या वातावरणात वार्षिक क्रीडास्पर्धाना प्रारंभ झाला..

You cannot copy content of this page