⚡मालवण ता.१९-:
मालवण तालुक्यातील हडी गावचे ग्रामदैवत श्री देव नागेश्वर मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी सर्व बारापाच मानकरी, देवस्थान विश्वस्त कमिटी व हडी ग्रामस्थ यांच्या देखरेखीखाली पारंपारिक उत्साहात संपन्न होणार आहे.
यानिमित्त सकाळी ६ वाजता श्री देव नागेश्वर व श्री वालकाई देवी आणि श्री देव नागेश्वर मंदिर संकुलातील सर्व देवतांना मंगलस्नान व सुवासिक फुलांनी विधिवत पूजा-अर्चा, सकाळी ७ वा. आदिशक्ती श्री वालकाई देवीची मानाची ओटी भरून, ओटी भरण्यास व नवसाची पुर्तता करण्यास प्रारंभ होऊन सनई वादन व पारंपरिक ढोल-ताश्यांच्या गजराने उत्सवाची नौबत केली जाईल. सकाळी ११ वा. ग्रामस्थांसाठी आरोग्याच्या दृष्टीने “ओंकार” साधना हा अध्यात्मिक कार्यक्रम (संयोजक सौ. किर्ती मनिष सुर्वे, बडोदा) होणार आहे. सायंकाळी ६.३० वा. श्री पावनाई देवी प्रासादिक दिंडी भजन मंडळ, माळगांव हुमरोस वाडी यांचे भजन, रात्री ९ वा. श्री देव नागेश्वर मंदिर संकुलामध्ये नेत्रदीपक दिपोत्सवाचे आयोजन, रात्रौ १० वा. गावराठी व आदिशक्ती श्री वालकाई देवी पालखी प्रदक्षिणा मिरवणुकीस प्रारंभ, रात्रौ १ वा. श्री. चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळाचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयावेळी दहिहंडी फोडून व महाआरती करून दहिकाला उत्सवाची सांगता होईल. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव नागेश्वर हितवर्धक मंडळ (देऊळवाडी) हडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
