युती न झाल्याची खंत नाही ; आम्ही खास. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात,आमदार निलेश राणे..
⚡कणकवली ता.१६-:
खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. त्यासाठी आम्ही वाट पाहिली देखील. त्यानंतर खासदारांनी आम्हाला स्पष्ट मार्गदर्शन केले आणि त्यानुसारच आम्ही आता मैदानात उतरलो आहोत. आम्ही करत असलेले सर्व काही त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सूचनेप्रमाणेच आहे, असे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
युतीबाबतच्या चर्चांवर बोलताना आम. निलेश राणे म्हणाले, आम्हाला जसे खासदार नारायण राणे सांगतील तसेच करणार आहोत. आत्ता आम्ही जे करत आहोत तेही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आहे. त्यामुळे ‘युती होईल आणि अर्ज मागे घ्यावे लागतील’ असे वाटण्याचे काहीच कारण नाही. पुढे काय करायचे ते पुढे ठरवू.
आपल्या शक्तीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले, आमची ताकद मोठी आहे. कोणालाही ती वेगळी सांगण्याची गरज नाही. ३ तारखेला आमचे अस्तित्व, आमचा विजय, फटाके आणि गुलाल पाहण्यासाठी सर्वांनी तयारीत असावे. आमचे लक्ष्य एकच मालवणचा विकास आणि जिल्ह्याचा विकास. यापासून तसूभरही बाजूला जाणार नाही.
दरम्यान, कणकवलीत नगराध्यक्ष पदासाठी उबाठाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर रिंगणात उतरले असून, त्यांनी कणकवलीकरांसोबतच सर्व मित्रपक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या विधानावर प्रतिक्रिया देताना आमदार निलेश राणे म्हणाले, त्यांच्या विधानावर का विचार करू नये? नक्की विचार करू. युती व्हावी म्हणून सर्वात आधी शिवसेना पुढे होती. आम्ही प्रयत्नही केले. पण काही जणांना युतीच करायची नव्हती म्हणून ती झाली नाही. मात्र काहींना आजही युती करायची आहे… होणारच! आम. निलेश राणेंच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.
