⚡कुडाळ ता.१६-: येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना संगीतमय मनोरंजनातून हसत खेळत संस्कार देणारा, जीवनानंदाचा संदेश देत खिळून ठेवणारा एक अप्रतिम कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमाला तरुण भारतचे संपादक शेखर सामंत, अमेरिकास्थित ज्येष्ठ उद्योजक डॉक्टर अजित शिरोडकर उभयता, उमेश गाळवणकर, चेतन प्रभू, मोहन होडावडेकर यांचीच प्रमुख उपस्थती होते.
आजच्या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानातील प्रगतीच्या जोरावर माणूस वेगाने बदलत चालला आहे. घरबसल्या माणसाला सर्व सोयी सुख सोयी उपलब्ध झाल्या आहेत; पण त्याचबरोबर माणूसपण मात्र हरवत चाललेला आहे. जगण्याच्या पद्धतीमध्ये संस्कार हरवत चाललेले आहेत. संवाद कमी होऊन माणसा माणसांमध्ये भिंती उभ्या राहिलेल्या आहेत. सर्वजन सर्वांमध्ये असूनही एकाकी झालेले आहेत. उद्याचा भारत घडविणारी बहुतांश पिढी संस्कारहीन होत चालली आहे. व्यसनाच्या आकर्षणात व विध्वंसक वाईट संगतीने समाज बरबाद करायला निघालेली आहेत. देश प्रगतीमध्ये ती अडसर बनू लागली आहेत.
ही भयाण परिस्थिती पाहता संस्कारक्षम शालेय पिढीला वाचवलं पाहिजे. म्हणून खोपोली येथील डॉक्टर संतोष बोराडे, त्यांचे इंजिनियर असलेले सहकारी प्रीतीश चौधरी, आर्किटेक्चर नरेंद्र भोईर या तिघांनी ‘जीवन संगीत’ नावाचा शालोपयोगी पर्यायाने समाज उपयोगी,देशप्रेम जागृत संगीतातून जीवन संदेश देणारा एक सुंदर कार्यक्रम तयार केला असून त्याचे सिंधुदुर्गातले पहिले सादरीकरण बाल दिनाच्या निमित्ताने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने नुकतेच पार पडले.
डॉक्टर संतोष बोराडे यांच्या रसाळ सुरेल आवाजातील निवेदनाच्या साथीने त्यांनी संस्कारहीन होत चाललेल्या बालकांच्या सामाजिक वास्तवावर विविध गीतांच्या अनोख्या अर्थपूर्ण थीम मधून प्रकाश टाकला. उपस्थित पालकांसहित विद्यार्थ्यांचा त्याला उस्फूर्त, सक्रिय सहभाग लाभला.
विविध परंपरा व भक्तीभावाने परिपूर्ण असलेली संस्कारक्षम गीत आज हिंदी मार्फत आपल्यासमोर कशी विकृतपणे पेश केली जातात हे अतिशय कलात्मक, हृदयाला भिडणाऱ्या वैचारिक ठेव्यातून विद्यार्थ्यांसमोर सादर केल. गीत गाताना इम्प्रेशन ऐवजी एक्सप्रेशन वर फोकस करा. असा संदेश अनेक गीत गायनाच्या उदाहरणातून विद्यार्थ्यांसमोर ठेवले. आपल्या अपेक्षांचे ओझे वाहून नेण्यासाठी गीतातून भावना व्यक्त करू नका तर त्यातून स्वानंद घ्या. संगीतातून संस्कृती जपायची आहे विकृती नाही याची आठवण करून देताना कलेतून आकार देणारा तो कलाकार याची सतत भान ठेवा. आपल्या भावना कलेतून सुंदर बनवा. त्याचे बाजारीकरण करू नका. कारण संगीत जगण्यात रंग भरत असते. त्यासाठी हृदयातून गाताना बुद्धीचा वापर करा आणि त्याचे अनुकरण करा असा संदेश दिला.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या विचारावर टिप्पणी करताना जीवन सुंदर आहे. त्याचा आनंद घ्या.तुम्ही जगाव म्हणून सैनिक सीमेवर लढत आहेत.आणि आपण शुल्लक अशा अपेक्षाभंगातून मृत्यूला कवटाळत आहोत. आपल्या देहाला व्यसनाने खोगीर करू नका. आधुनिकतेचा ध्यास नक्की घ्या. पण पाश्चातिकीकरणाला आधुनिकीकरण समजून त्याचे अंधानुकरण करू नका. जगात पूजनीय, अनुकरणीय असलेली आपली परंपरा अद्वितीय आहे त्याद्वारे जीवन घडवा. आई-वडिलांचा सन्मान करा. एका प्रेमळ स्पर्शातून त्यांना जन्माचं सार्थक झाल्याची अनुभुती द्या.
अंगावर शालेय गणवेश असताना चुकीचे वर्तन टाळा… असा गीतांच्या सादरीकरणातून त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला. आणि सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन याचा आनंद घेत होते.
प्रमुख उपस्थिती लाभलेले शेखर सामंत यानी सुद्धा ‘दोन तास जागेवर खेळवून ठेवणारा जीवनानंदाचा, संस्कारचा संदेश देणारा आगळावेगळा आणि आजच्या शालेय विद्यार्थ्यांना अतिशय गरजेचं असणारा कार्यक्रम असे कौतुक केले.
तर उमेश गाळवणकर यांनी व्यवहारापेक्षा नफा फायद्यापेक्षा विद्यार्थ्यांवर संस्कार चांगले व्हावे हा मानस समोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले व एक उत्तम कार्यक्रम संस्कारक्षम कार्यक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर संतोष बोराडे व टीमचे त्यांनी आभार मानले. ह्या सामाजिक बांधिलकीने काम करणाऱ्या या टीमच्या मार्फत विविध शाळांनी विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याच्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व ते कार्यक्रम शाळेमध्ये सादर केल्यास आजची पिढी बऱ्याच अंशी बदलू शकते. असा आशावादही व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले. यावेळी सर्व विविध विभागाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये उमटले ‘जीवन संगीत’चे संस्कारक्षम सूर…
