स्मार्ट मिटर संदर्भात मनसे आक्रमक…

स्मार्ट मीटर बसवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांसोबत विपरीत घटना घडल्यास महावितरणचे अधिकारी जबाबदार:मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांचा इशारा..

⚡सावंतवाडी ता.१४-: स्मार्ट मीटर संदर्भात मनसे आक्रमक झाली असून महावितरणचे अधिकारी नागरिकांना संभ्रमात ठेवत आहेत. जुने मीटर खराब झाले की त्याऐवजी स्मार्ट मीटरच बसवण्याची जबरदस्ती करत आहेत. ग्राहकांच्या घरी सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांसोबत कोणतीही विपरीत घटना घडल्यास त्यास महावितरणचे अभियंता व अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ दिला.


राऊळ म्हणाले की, स्मार्ट मीटर संदर्भात राज्य सरकार आणि महावितरणचे अधिकारी जनतेत गोंधळ निर्माण करत आहेत. महावितरणकडे जुने मीटर दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध असताना, कोणताही पर्याय न देता थेट स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जात आहे. या जबरदस्तीमुळे गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठांकडून दबाव येतो आणि त्याचे खापर खालच्या कर्मचाऱ्यांवर फोडले जाते. स्मार्ट मीटर बसवण्याबाबत विचारणा केल्यावर नोव्हेंबर २०२५ पर्यंत सर्व जुन्या मीटरची अदलाबदल करून स्मार्ट मीटर बसवण्याचा कमर्शियल आदेश आहे, अशी माहिती अभियंता राक्षे यांनी दिली. या सक्तीमुळे नागरिकांना योग्य विद्युत सेवा मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोपही राऊळ यांनी केला. त्यांनी इशारा देताना सांगितले की, ग्राहकांना वेटीस धरून महावितरण नेमके काय साध्य करू इच्छिते? या मनमानीमुळे सामान्यांना त्रास झाला, तर मनसे जशास तसे उत्तर दिले जाईल, असे राऊळ यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page