सुरेश बापर्डेकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी..
⚡मालवण ता.११-:
मालवण तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या विकसित आणि निसर्गरम्य गाव असलेल्या तारकर्ली – देवबाग येथे पर्यटकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या कोंडीमुळे मोठ्या एसटी बसला देवबागपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. परिणामी काही फेऱ्या तारकर्लीतूनच वळवाव्या लागतात किंवा अचानक बंद कराव्या लागतात. या गंभीर समस्येकडे भारतीय जनता पक्षाचे तालुका शहर सचिव सुरेश बापर्डेकर यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांचे लक्ष वेधत तातडीने चार मिनी बसेस उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
तारकर्ली मार्गावरील रस्ता अरुंद आहे. कोरोना महामारीपूर्वी या मार्गावर मिडी बसेस सुरू होत्या. मात्र त्या बंद पडल्या आणि त्या परत सुरू झाल्या नाहीत. सध्या पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने मोठ्या बसेस चालवताना वाहतूक कोंडी होते. याचा सर्वाधिक फटका गावातील विद्यार्थी आणि प्रवाशांना बसत आहे. शाळा, कॉलेज आणि कामासाठी दररोज मालवणला ये-जा करतात. त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आणि वेळेवर पोहोचता येत नाही. अनेकदा देवबागहून येणाऱ्या बसेस पूर्ण भरलेल्या असल्याने मधल्या थांब्यांवर शाळा-कॉलेजच्या मुलांना बसमध्ये जागा मिळत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
पूर्वीप्रमाणेच मिडी बसेस सुरू झाल्यास विद्यार्थ्यांसह सर्व प्रवाशांची गैरसोय दूर होईल. मालवण आगारातून सकाळी आणि सायंकाळी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार बाजारपेठ मार्गे चार फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली आहे. या फेऱ्या सुरू झाल्यास भूतनाथ, देवली, दत्तमंदिर, वायरी, काळेथर, तारकर्ली आणि विठ्ठल मंदिर देवबागपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत, कॉलेजमध्ये पोहोचता येईल. प्रवाशांना उन्हात, पावसात बसची ताटकळत वाट पाहावी लागणार नाही. अरुंद रस्त्यावर मिडी बसेसमुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि बसेस अचानक बंद करण्याची वेळ येणार नाही. या फेऱ्या बाजारपेठ मार्गे झाल्यास प्रवाशांमुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल असे सुरेश बापर्डेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
मोठ्या बसेस चालवणे शक्य होत नसल्यास अचानक चार-चार दिवस फेऱ्या बंद केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतात आणि त्यांना खासगी वाहनांना भरमसाठ पैसे देऊन प्रवास करावा लागतो. याबाबत सन २०२३ पासून संबंधित मंत्री, महाव्यवस्थापक मुंबई, आगार व्यवस्थापक मालवण आणि विभागीय नियंत्रक सिंधुदुर्ग यांच्याकडे आपण सातत्याने पत्रव्यवहार आणि बैठका घेऊन या समस्येचा पाठपुरावा केला आहे. यात महाव्यवस्थापक (वाहतूक) मुंबई यांनी लेखी पत्राद्वारे १२५० मिडी बस प्रस्तावातील चार बसेस मालवण आगाराला देण्यात येतील, असे कळवले आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर चालना मिळावी यासाठी श्री. बापर्डेकर यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांना निवेदन दिले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे मालवण तालुका शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेवक पंकज सादये, सन्मेश परब उपस्थित होते.
