मालवणात उबाठा शिवसेनेचा नगराध्यक्ष व संपूर्ण पॅनेल विजयी होण्यासाठी महिला आघाडी कार्यरत…

महिला पदाधिकाऱ्यांचे प्रतिपादन:उबाठा शिवसेनेचे निष्ठावंत आणि प्रामाणिक शिवसैनिक आजही संघटनेसोबतच..

⚡मालवण ता.११-: गेल्या वर्षभरात नवीन खासदार आणि आमदार यांच्याकडून मालवण शहरात कोणताही विकास झालेला नाही. लाडकी बहीण योजना आता फसवी असल्याचे दिसून आलेले आहे. महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मतदार त्रस्त असून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत मतपेटीतून मतदारांची नाराजी स्पष्टपणे दिसून येणार आहे. मालवण नगरपालिकेवर पुन्हा एकदा उबाठा शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि संपूर्ण पॅनेल विजयी होण्यासाठी महिला आघाडी आणि इतर पदाधिकारी एकजुटीने कार्यरत झालेले आहेत, असे प्रतिपादन उबाठा शिवसेनेच्या मालवण महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले.

मालवण येथील उबाठा शिवसेना तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, माधुरी प्रभू, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे, रुपा कुडाळकर, सौ. सरमळकर, पूजा जोगी, गौरी सावंत तसेच शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, लारा देसाई, बंड्या सरमळकर, अक्षय भोसले, मडये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मालवण नगरपालिका निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षासह २० नगरसेवक विजयी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. उबाठा शिवसेनेचे निष्ठावंत आणि प्रामाणिक शिवसैनिक आजही संघटनेसोबतच आहेत. गतवेळीही अनेक शक्ती आमच्या विरोधात असतानाही आम्ही नगराध्यक्षासह युतीची सत्ता नाईक यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत आणली होती. यामुळे याहीवेळी आम्ही तयार आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही शिवसैनिक आमच्या सोबत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे कोण गेले तरी पक्ष आणि निष्ठावंत कार्यकर्ते कायम असल्याचेही दिसून आल्याचे महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मालवण शहरातील खड्डेमय रस्ते गेले वर्षभर आमदार करू शकले नसल्याने त्यांच्या विकासाचे व्हीजन दिसून आले आहे. वैभव नाईक आमदार असताना त्यांनी आणलेला निधी आणि मंजूर केलेल्या विकासकामांची उद्घाटने करण्यातच विद्यमान लोकप्रतिनिधी गुंतले आहेत. शहरातील जनतेला कोणी कसा निधी आणला, आणि कोणी कामे केली, हे सर्व माहिती असल्याने आम्हाला मतदारांसमोर जाताना आनंदच मिळणार आहे, असेही महिला पदाधिकारी म्हणाल्या. तसेच आपल्या वैयक्तिक व आर्थिक फायद्यासाठी काही महिला पदाधिकाऱ्यांनी उबाठा शिवसेनेचा त्याग करून इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष सोडून गेल्यामुळे उबाठा शिवसेनेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. या महिला पदाधिकाऱ्यांना निष्ठावंत शिवसैनिक जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशाराही महिला पदाधिकाऱ्यांनी दिला.

ओबीसी महिला नगराध्यक्ष आरक्षण आणि इतर दहा महिला नगरसेविका मालवण नगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहेत. उबाठा शिवसेनेकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. आम्ही नवीन चेहऱ्यांना पुढे आणण्यासाठी यावेळी निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचे माजी नगरसेविका तृप्ती मयेकर व आकांक्षा शिरपुटे यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page