*चौके सरपंच राजा गावडे यांची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिठारी आणि डॉ पोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी*
*💫मालवण दि.१०-:* मालवण तालुक्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू असून अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे अनेकांना लस केंद्रावरून मागे फिरावे लागते. तर अनेकांना अजून दुसरा डोस मिळालेला नसल्याने लसचा पुरेसा साठा उपलब्ध करावा तसेच ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नसल्याने लस नोंदणीसाठी ऑफलाईन सेवा उपलब्ध करून लसीकरण मोहिमेत सुसूत्रता आणावी अशी मागणी चौके गावचे सरपंच राजा गावडे यांच्यासह ग्रामस्थांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी आणि डॉ पोळ यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. लसीकरण मोहिमेत येणाऱ्या विविध अडचणी बाबत चौके ग्रामस्थांच्या वतीने सरपंच राजा गावडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांच्याकडे निवेदन सादर करून लक्ष वेधले. यावेळी पं. स. सदस्या मनीषा वराडकर,मालवण पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गावडे, नितीन गावडे,अशोक चव्हाण ,आंबेरी सरपंच सौ. साक्षी कांबळी, सुरेश चौकेकर, बुधाजी चौकेकर, राघो गावडे, मंदार गावडे, कृष्णा चौकेकर, मनोज चौकेकर, सदानंद गावडे आदी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लोकांमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण घेण्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून लसीकरण केंद्रावर शेकडोंच्या संख्येने उपस्थिती असते. मात्र अपुऱ्या लस साठ्यामुळे ग्रामस्थांना माघारी जावे लागते. जिल्हास्तरावरून ज्यादा लस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच अनेकांच्या दुसऱ्या डोसची मुदत पूर्ण झालेली असूनही अद्याप त्यांना दुसरा डोस मिळालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थाना दुसरा डोस तातडीने उपलब्ध करावा असेही म्हटले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण भाग असून मालवण तालुक्यातील अनेक गावांत मोबाईल नेटवर्क नाही. तिथे रेंज प्राप्त होत नाही. त्यामुळे लस नोंदणीसाठी ऑफलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणीही सरपंच राजा गावडे यांनी केली आहे.
