⚡मालवण ता.०६-:
आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर येथे आयोजित शोकसभेत आचरा येथील श्री रामेश्वर वाचन मंदिर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरा, वैभवशाली पतसंस्था आचरा, यशराज संघटना आचरा, कथामाला मालवण शाखा, कोमसाप मालवण शाखा या संस्थांतर्फे वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आचरा वाचनालय संस्थेचे अध्यक्ष बाबाजी मिसळे यांनी कै. गवाणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. गवाणकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना गंगाराम गवाणकर यांच्या जाण्याने मालवणी बोलीभाषेचे मोठे नुकसान झाल्याची खंत भिसळे यांनी व्यक्त केली. आचरा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष व कै.गवाणकर यांचे नातेवाईक श्री.अशोक कांबळी यांनी गवाणकर यांना नाटकांबद्दल कशी ओढ होती, गावातील नाटके बसवतानाचे त्यांचे अनुभव, त्यांचा प्रेमळ स्वभाव इत्यादी बद्दल आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे उपाध्यक्ष सुरेश गावकर यांनी अशोक कांबळी यांची कन्या सौ. प्रज्ञा कांबळी – चव्हाण यांनी कै. गवाणकर यांच्या निधनानंतर त्यांना वाहिलेली श्रद्धांजली वाचून दाखविली. वैभवशाली पतसंस्था आचराचे चेअरमन श्री. मंदार सांबारी यांनी कोमसापच्या जिल्हास्तरीय अधिवेशनासाठी कै. गवाणकर हे अध्यक्ष म्हणून लाभले असताना त्यांचा सहवास आपल्याला लाभल्याचे सांगत जरी गवाणकर गेले तरीही आपली मालवणी भाषा आपण जपली पाहिजे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा भावना व्यक्त केल्या. कथामाला मालवणच्या सचिव श्री.सुगंधा गुरव यांनी गवाणकर यांनी लिहिलेली नाटकाची पुस्तके व कोमसाप जिल्हास्तरीय अधिवेशनाच्या अध्यक्षपदी त्यांनी केलेले भाषण इ. बद्दल सांगून भावना व्यक्त केल्या. यशराज संघटनेचे अध्यक्ष मंदार सरजोशी यांनीही श्रद्धांजली वाहिली.
यावेळी कोमसाप शाखा मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी गवाणकर यांचा बऱ्याचवेळा सहवास लाभल्याचे सांगत गवाणकर यांचे आत्मचरित्र ‘व्हाया वस्त्रहरण ‘ याबद्दल माहिती देऊन प्रत्येकाने मालवणी भाषा जपा असा संदेश दिला. तसेच ठाकूर यांनी ‘ऐसी अक्षरे, सारस्वत मित्र, मायमावशी, दर्यावर्दी ‘ हे चार दिवाळी अंक वाचन मंदिरास भेट देऊन कै. गवाणकर यांना श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचालन ग्रंथपाल विनिता कांबळी येई केले. या कार्यक्रमास विविध संस्थांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
