किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती आक्रमक:तहसीलदारांना निवेदन सादर करून तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची केली मागणी..
⚡मालवण,ता.०५-:
अठराव्या शतकाच्या प्रारंभी बांधण्यात आलेल्या मालवण शहरातील राजकोट मेढा येथील ब्रिटिशकालीन पुरातन स्मारकाची
अज्ञाताने तोडफोड केल्याचे उघड झाल्यानंतर मालवणच्या किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीने या तोडफोडी बाबत प्रशासनाचे लक्ष वेधले असून आज मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांची भेट घेत ब्रिटिश कालीन स्मारकाची तोडफोड करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशा मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे याबाबतचे निवेदन तहसीलदारांबरोबरच मालवण पोलीसानाही देण्यात आले आहे
राजकोट मेढा येथील ब्रिटिशकालीन पुरातन स्मारकाची अज्ञाताने तोडफोड केल्याचे समजताच सर्वत्र खळबळ माजली याबाबत आज किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरू राणे, इतिहास संशोधिका डॉ. ज्योती बुवा तोरसकर, हेमंत वालकर यांच्यासह अन्य सदस्यांनी तहसीलदार वर्षा झालटे यांची भेट घेत निवेदन सादर केले.
किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती गेली पंधरा वर्षे सिंधुदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धनासाठी जनजागृतीचे काम करत आहे. यासाठी अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे. सिंधुदुर्ग मधील हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी दरवर्षी देश विदेशातून लाखो पर्यटक येतात. येथील राजकोट मेढा या भागात ब्रिटिशांनी सन १८२० मध्ये जहाज अपघातात मरण पावलेल्या ब्रिटिश सार्जंट जॉन गार्वेन, कमांडिंग कर्नल रॉबर्ट वेब तसेच त्यांच्या अन्य सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक बांधले आहे. त्यात दोन स्तंभ आणि एक कबरीचा समावेश आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांची तोडफोड केल्याचे आढळून आले आहे आणि त्या स्मारकांवर असणाऱ्या संगमरवरी पाट्याही काढून टाकण्यात आल्या आहेत. अशी स्मारके ही इतिहास संशोधनाची साधने असतात तसेच अशा साधनांमधून पर्यटकांना हेरिटेज वॉकचा आनंद घेता येतो. या घटनेमुळे विद्यार्थी, इतिहास संशोधक, इतिहास प्रेमी आणि पर्यटकांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. म्हणूनच या चिड आणणाऱ्या कृत्य करणाऱ्या समाजकंटकांचा छडा लावून त्यांच्यावर त्वरित योग्य ती कारवाई करावी आणि स्मारकातील काढून टाकण्यात आलेल्या संगमरवरी पाट्या त्वरित ताब्यात घेण्यात याव्यात. इतिहास आणि पर्यटनाला बाधा आणणाऱ्या अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या घटनेचा आपण गांभीर्याने विचार करावा अशी विनंतीही किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य यांनाही पाठविण्यात आले आहे.
