कुणकेश्वर मंदिर महाशिवरात्री यात्रेसाठी विशेष वाहतूक आराखडा…

⚡देवगड ता.१४-: श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त १४ ते १७ फेब्रुवारी या कालावधीसाठी कुणकेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतुकीचे सुयोग्य नियोजन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कुणकेश्वर देवस्थानकडे जाणारे रस्ते हे अरुंद आहेत. यात्रेकरू हे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. यात्रा कालावधीत सार्वजनिक वाहतूक सुरळीत राहवी, याकरिता वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

यात्रा कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत राहणे नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून वाहतुकीबाबत आदेश निर्गमित केले आहेत. १४ फेब वारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत पोलीस प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे पालन करणे वाहनधारकांना बंधनकारक राहणार आहे. कुणकेश्वर येथे देवगड-आचरा रोडवर तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलेले देवगड, कणकवली, आचरा व मालवण बसस्थानकाच्या पुढे करण्यात आलेल्या बॅरिकेटींगपासून कुणकेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यावश्यक वाहने सोडून इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर ठिकाणी करण्यात आलेल्या पार्किंग ठिकाणी वाहने पार्क करावीत. तसेच वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. यात देवगड ते आचराकडे जाणारा मार्ग मिठमुंबरी तिठा- सुके तळे- दहिबाव- मशवी तिठामार्गे आचरा रोडचा वापर करावा. आचरा ते देवगडकडे येणारा मार्ग मशवी तिठा- दहिबाव दाभोळे-खाकशी तिठामार्गे देवगड रोडचा वापर करावा. आचरा ते देवगडकडे येणारा मार्ग मिठबाव (पिंपळ तिठा) ते दहिबाव-दाभोळे- खाकशी तिठा मार्गे देवगड रोडचा वापर करावा.

यात्रा कालावधीत काही ठिकाणी ‘नो पार्किंग’ झोन निर्माण करण्यात आले आहेत. यात कुणकेश्वर-तारामुंबरी देवगड हा रस्ता आपत्कालीन मार्ग असल्याने संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे. देवगड शहर ते कुणकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर तारामुंबरी ब्रिज येथून सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून) तीन कि. मी. परिसरात वाहने पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे. लिंगडाळ तिठा ते कुणकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर सुके तळे येथून सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून) ३ कि. मी. परिसरात वाहने पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे. मिठबावकडून येणाऱ्या मार्गावर कातवण येथील पेट्रोलपंप येथून सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून) पाच कि. मी. परिसरात वाहने पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे. हा आदेश पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहीका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page