⚡कुडाळ ता.१४-: संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे वाणिज्य विभागाच्या, वाणिज्य मंडळातर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी “केंद्रीय अर्थसंकल्प अवलोकन आणि त्याचा विविध क्षेत्रावर होणारा परिणाम” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रथितयश लेखापरीक्षक (सीए) सायली ठाकूर या व्याख्यात्या म्हणून लाभल्या होत्या.
या व्याख्यानात बोलताना त्यांनी अर्थसंकल्प म्हणजे काय, त्याचा नेमका उद्देश काय असतो, तसेच देशातील नागरिकांवर त्याचा काय परिणाम होतो, देशातील विविध क्षेत्रावर त्याचा कसा परिणाम होतो, याविषयी अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पात सुरू होत असलेल्या विविध योजना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी याविषयी त्यांनी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत करून विविध कौशल्य आत्मसात करावेत असे आवाहन ही केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाणिज्य मंडळाची सदस्य कु. पूजा घोगळे हिने, सूत्रसंचालन कु. निवेदिता मेस्त्री हिने तर प्रमुख पाहुण्यांची ओळख कु. अनंत प्रभू याने करून दिली. या कार्यक्रमाचे ऋणनिर्देश कु. ऋतुजा सावंत हिने केले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील द्वितीय व तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. प्रकाश मसुरकर, प्रा. स्वप्नाजा चांदेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
संत राऊळ महाराज कॉलेज मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर व्याख्यान…
