मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी १९ रोजी शिवजयंती…

राणे यांच्या संकल्पनेतून शिवकालीन ऐतिहासिक प्रतिकृतींचे प्रदर्शन..

⚡सावंतवाडी ता.१४-: मळगाव–रस्तावाडी येथील शिवभक्त ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी मंगळवार, १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव ऐतिहासिक वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
यंदा या उपक्रमाचे सलग ८ वे वर्ष असून, शिवकालीन इतिहास जपण्याच्या व पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. या निमित्ताने राणे यांच्या संकल्पनेतून शिवकालीन ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहातील निवडक व दुर्मिळ शिवकालीन वस्तूंच्या प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ९.३० वाजल्यापासून रात्री १०.०० वाजेपर्यंत सर्व शिवप्रेमींसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनात मराठा आरमारातील सामर्थ्य दर्शविणाऱ्या मराठा आरमारातील तब्बल ८ जहाजांच्या प्रतिकृती पाहायला मिळणार आहेत., मराठ्यांच्या शस्त्रागारातील प्रमुख शस्त्र असलेली मराठा धोप, मावळ्यांच्या शौर्याला साजेशी मराठा वर्क धोप, तसेच शिवप्रतापाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण, अफजलखान वधावेळी वापरण्यात आलेली वाघनखे व कट्यार यांच्याही प्रतिकृती प्रदर्शनात असणार आहेत. तसेच इतिहासप्रेमींसाठी मराठा आरमार ग्रंथातील २२ ऐतिहासिक छायाचित्रांचे प्रदर्शन, मराठा आरमारातील जहाजांवर वापरल्या जाणाऱ्या तोफांच्या प्रतिकृती, तसेच पावनखिंडीत बलिदान देणाऱ्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची ऐतिहासिक वंशावळ व दांडपट्टा हे विशेष आकर्षण ठरणार आहे. याशिवाय शिवकालीन ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्सल पेहराव दर्शविणारी दुर्मिळ छायाचित्रे, मराठा शस्त्रागारातील विविध शस्त्रे — विशेषतः उर्मी व दांडपट्टा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२ किल्ले व दुर्गांचे छायाचित्र प्रदर्शन, ऐतिहासिक शिक्क्यांचे मजकूर, गोमंतकीय भागातील दुर्गांची माहिती, छत्रपती संभाजी महाराजांचे हस्ताक्षर, मनुची संग्रहातून छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रे, तसेच ऐतिहासिक नाण्यांचे विशेष प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या भव्य शिवकालीन प्रदर्शनामुळे मळगाव व पंचक्रोशीतील शिवभक्त, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी व शिवप्रेमींना शिवकालीन इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे. हा उपक्रम म्हणजे केवळ उत्सव नसून एक दिवसाचा शिवअभ्यास पर्व असल्याचे मत व्यक्त करत, सर्व शिवभक्तांनी व शिवप्रेमींनी आवर्जून भेट देऊन या ऐतिहासिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानेश्वर राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page