पलायन करणाऱ्या कार चालकाच्या पोलिसांनी घेतले ताब्यात_
*💫वैभववाडी दि.१०-:* भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने करूळ येथील वयोवृद्ध महिलेला उडविले,या अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक देऊन पलायन करणाऱ्या कार चालकाला वैभववाडी पोलिसांनी येथील संभाजी चौकात मोठ्या शिताफीने अडविले आहे. करूळ आंबेवाडी येथील श्रीमती गंगाबाई मनोहर कोलते वय 75 या कामानिमित्त जामदारवाडी येथे जात होत्या. पुणेहुन कणकवलीकडे जाणा-या कारने या वयोवृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत तिच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. धडक देऊन सदर वाहन चालक वैभववाडीच्या दिशेने पळून गेल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ संतोष सावंत यांनी वैभववाडी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस हवालदार राजू जामसंडेकर यांनी त्या वाहनचालकाला येथील संभाजी चौकात गाडी आडवी लावत रोखले. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
