कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समितीच्या प्रयत्नांना यश: जिल्हा मुख्यालयाला जलदगाडीचा थांबा मिळाल्याने प्रवाशांत आनंदाचा उत्साह..
⚡सिंधुदुर्गनगरी ता ३-:
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समितीच्या अथक प्रयत्नाने तसेच कोकण रेल्वे बोर्ड व रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर मरुसागर एरणाकुलम अजमेर एक्सप्रेस या गाडीला प्रथमच थांबा मिळाला आहे आज पहिल्या दिवशी या गाडीचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या तसेच दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने गाडीला पुष्पहार व श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर मरुसागर एर्नाकुलम अजमेर एक्सप्रेस या गाडीला थांबा देण्यात आला आहे .आज सोमवारी प्रथमच थाबलेल्या गाडीच्या स्वागतसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर ,सचिव अजय मयेकर ,जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर,उपाध्यक्ष परशुराम परब, जिल्हा कार्याध्यक्ष शुभम परब,सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक संघटना अध्यक्ष आप्पा मांजरेकर ,सचिव सुमित सावंत .,उपाध्यक्ष प्रणाली अवसरे,जिल्हा सहसचिव साई आंबेरकर ,कसाल सरपंच राजन परब, तळगाव सरपंच लता खोत, जयेंद्र परब, रिक्षा संघटना अध्यक्ष सुनील पाताडे, गावराई सरपंच सोनल शिरोडकर,मंदार पडवळ,सहसचिव राहूल शिर्के,विष्णू प्रसाद दळवी, महेश परुळेकर
विलास पालव, आदीसह रेल्वे प्रवासी संघटनेचे विविध पदाधिकारी व दशक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग हे जिल्हा मुख्यालयाचे मुख्य रेल्वेस्थानक असल्याने येथे जलद गाड्यांना थांबा मिळावा . या मागणीसाठी सातत्याने कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरु होते . यासाठी जनआंदोलन उभारून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते, त्याचबरोबर खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे ,आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातूनही रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, कोकण रेल्वे रिजनल मॅनेजर शैलेश बापट , कोकण रेल्वे बोर्डाने सिंधुदुर्ग स्टेशनवर मरूसागर एर्णाकुलम अजमेर एक्सप्रेस या साप्ताहीक जलद गाडीला थांबा मंजूर केला असून दुपारच्या वेळेत ठीक १२.३४ वाजता मुंबईच्या दिशेने जाणारी ही मरुसागर एर्णाकुलम अजमेर एक्सप्रेसला सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. आज ही गाडी सिधुदूर्ग स्थानकावर दुपारी १ .२० वाजता आली असता प्रवासी संघटनेच्या वतीने मोटरमैनचे पुष्पगुच्छ देऊन तसेच गाडीला पुष्पहार घालून स्वागत केले . यानंतर बोलताना रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर म्हणाले की प्रवासी संघटनेच्या सततच्या पाठपुरावामुळे लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांना कणकवली व सिंधुदुर्ग स्थानकावर थांबा मंजूर झाला आहे तसेच संघटनेच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर तिकीट आरक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे यापुढेही कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समितीच्या वतीने खासदार नारायण राणे पालकमंत्री निलेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून रेल्वेच्या विविध समस्यांसाठी आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत तसेच रेल्वेच्या काही नियमित गाड्या ना येथे थांबा मिळावा व प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न कायम राहणार आहेत असे सांगितले .
