बांदा/प्रतिनिधी
येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशाळेतील संगणक कक्षाचे उद्घाटन स्कूल कमिटी सदस्य भिकाजी धुरी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर स्कूल कमिटी सदस्य नारायण पित्रे, सुरेश गोवेकर, महादेव सावंत मोर्ये, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई आदी उपस्थित होत्या. मान्यवरांचे मुख्याध्यापिका सौ. देसाई यांनी स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली.
भिकाजी धुरी म्हणाले, सध्याच्या युगात संपूर्ण जगामध्ये इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्व कार्यपद्धती ही संगणकीय होत चालली आहे. या संगणकाचे ज्ञान प्रात्यक्षिकासहीत विद्यार्थ्यांना लहान वयातच मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांची गरज ओळखून स्कूल कमिटी यांनी सुंदर असे संगणक कक्ष विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळात या संगणकाचा वापर करून टायपिंग, इतर संगणकीय कार्यप्रणाली प्रात्यक्षिक या माध्यमातून शिकावयास मिळणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देसाई यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. कल्पना परब यांनी करून आभार मानले. यावेळी पालक, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन…
