*💫सावंतवाडी दि.१०-:* कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑक्सिजन सिलेंडर देऊन मदतीचा हात दिल्याने गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांच्यावर केलेले आरोप आणि टीका ही निषेधार्ह असून, सावंतवाडी भाजपच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब आणि भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी आज सावंतवाडीत जाहीर निषेध व्यक्त केला आहे. जिल्ह्याला ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता असल्याने माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे सिलिंडर देण्याची विनंती केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जिल्ह्याला ऑक्सिजन सिलिंडर देखील दिले होते. परंतु गोवा कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करत टीका करत आहे. या कठीण काळात शत्रू राष्ट्र देखील मदतीचा हात पुढे करत असताना शेजारील राज्याने मदत केली म्हणून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करणे चुकीचे असल्याचे मत नगराध्यक्ष संजू परब आणि भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी व्यक्त केले आहे.
सावंतवाडी भाजपतर्फे गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा करण्यात आला निषेध
