कुडाळच्या पंचायत DPRC बांधकामासाठी वाढीव निधीची मागणी..
⚡कुडाळ ता.०५-: तालुक्यातील नाबरवाडी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन २०१२ साली ५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. या केंद्राच्या कामाला देखील सुरुवात झाली. मात्र नंतरच्या काळात हे काम पूर्णपणे बंद होऊन महत्वकांक्षी असलेले ग्राम संसाधन केंद्र गेली दहावर्षे अपूर्णावस्थेत होत. या प्रकरणी आमदार निलेश राणे यांनी आज ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांची भेट घेऊन या केंद्राच्या पूर्णत्वासाठी वाढीव निधी देण्याची मागणी केली.
हे ग्राम संसाधन केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी अजून ५ कोटींच्या निधीची आवश्यकता असून हा निधी मिळावा यासाठी ग्रामविकास तथा पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आमदार निलेश राणे यांनी निवेदन सादर करत वस्तुस्थिती मांडली.
या भेटीचे फोटो आमदार निलेश राणे यांनी ‘एक्स’ वर प्रसिद्ध केले असून त्यात हे केंद्र पूर्णत्वास गेल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रशिक्षण, संशोधन व सक्षमीकरणासाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळणार आहे अशी भावना व्यक्त केली आहे.