डॉ. विजय सूर्यवंशी:कोकण आयुक्तांची बिबवणे ग्रा.प. ला भेट,विशेष सहाय्य योजनेतील पाच लाभार्थीना लाभ प्रमाणपत्र वाटप..
कुडाळ :आपल्या गावामध्ये योजनेपासून कुणी व्यक्ती वंचित राहू नये यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. ग्रामस्थांनी जागरूक राहून सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे. महसूल सप्ताहात वारस नोंदी तसेच अनेक दाखल्यांचे वाटप सुरू आहे त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभाग आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केले. मंगळवारी कुडाळ तालुक्यातील बिबवणे ग्रामपंचायत येथे त्यानी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. गावस्तरावर आरोग्य व शाळेच्या बाबबतीत काही अडचणी असतील तर वरीष्ठ अधिकाऱ्यांना सांगा, असेही त्यांनी सांगितले.
महसूल दिनानिमित्त राज्यात 1 ते 7 ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महसूल विभागाच्यावतीने या सप्ताहानिमित्त कोकण विभाग आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी आज बिबवणे ग्रामपंचायत येथे भेट दिली. जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, कोकण विभाग अप्पर आयुक्त डॉ. माणिक दिवे,उपविभागीय अधिकारी (कुडाळ) ऐश्वर्या काळूशे, कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे व बिबवणे सरपंच सृष्टी कुडपकर तसेच अन्य अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.
महसूल विभागाच्यावतीने या सप्ताहानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. सुर्यवंशी, जिल्हाधिकारी श्री पाटील, जि. प. मुख्याधिकारी श्री खेबुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचा कार्यक्रम झाला.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, सरकारच्या विविध योजना आहेत. त्या योजनापासून आपल्या गावातील कुणीही व्यक्ती वंचित राहता नये. यासाठी गाव पातळीवरील स्थानिक प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. सर्व प्रकारचे शासकीय योजना असतील किंवा सर्व प्रकारचे वैयक्तिक दाखले असतील. त्याचा लाभ ग्रामस्थानी घ्यावा. याबाबत मार्गदर्शन करायला शासकीय अधिकारी – कर्मचारी आहेत. सध्या महसूल सप्ताह सुरू आहे.या वारस नोंदी असतील तर त्या करा. अनेक प्रकारच्या दाखल्यांचे वाटप सुरू आहे.त्याचा लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य तसेच शाळेच्या बाबतीत काही अडचणी असतील, तर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनाला आणा, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगून ग्रा. प.कार्यालय, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय हे सर्व एकाच ठिकाणी पाहून छान वाटले. आनंद झाला. या परिसरात नारळ, पोफळीच्या झाडांची लागवड करा, असे ते म्हणाले.
आरोग्य उपकेंद्र, शाळा, ग्रामपंचायत स्तरावरील सद्यपरिस्थितीबाबत डॉ. सूर्यवंशी यांनी माहिती जाणून घेतली. तसेच काही मार्गदर्शक सूचनाही त्यांनी केल्या. कुडाळचे नायब तहसीलदार संजय गवस, निवासी नायब तहसीलदार प्रतापसिंह जाधव, ग्राम विस्तार अधिकारी (. कुडाळ प. स.) संजय ओरोसकर , कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर, कसाल सरपंच राजन परब, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, मंडळ अधिकारी (पिंगुळी ) गुरुनाथ गुरव, संजय गांधी निराधार योजना विभागाच्या महसूल सहाय्यक अधिकारी वैजयंती प्रभू व गीता तांडेल, लक्ष्मीकांत पालव, कृषी विस्तार अधिकारी (प. स.) महादेव खरात, संदेश परब व सोनिया पालव, बिबवणे उपसरपंच दीपक सावंत,ग्रा प. सदस्या आर्या मार्गी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुधीर लुडबे, पोलीस पाटील शैलेश राऊळ, राजन नागवेकर,ग्रा. प माजी सदस्या मानसी माळकर, रतन वेंगुर्लेकर, शिल्पा नाईक, ग्रामसेविका अन्वी शिरोडकर, तलाठी सोनल जाधव,हिलोक प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक एस. पी. धामणकर, बिबवणे प्राथमिक उपकेंद्राच्या सीएचओ शलाका चव्हाण, आरोग्य सेवक यशवंत गावडे,आरोग्य सेविका आय.एम परब, प्राथमिक शाळा क्र. 1 च्या मुख्याध्यापिका सोनाली दळवी, शिक्षक एकनाथ कुर्लेकर तसेच पंचक्रोशीतील पोलीस पाटील तसेच तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी तसेच महसूल,आरोग्य व पंचायत समितीच्या विविध विभागाचे अधिकारी- कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ सूर्यवंशी व अन्य मान्यवरांचे स्वागत विभागीय अधिकारी सौ.काळुशे, तहसीलदार श्री वसावे, सरपंच सौ कुडपकर व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केले.सूत्रसंचालन व आभार आरोग्यसेवक प्रकाश तेडुलकर यांनी मानले.
याप्रसंगी विशेष सहाय्य योजनेतील नवीन मंजूर प्रकरणांमधील एकूण पाच लाभार्थीना लाभ मंजूरी आदेश प्रमाणपत्र डॉ सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात वैशाली विलास बिबवणेकर (बिबवणे ), मालती मधुकर हरमलकर (झाराप), भारती रमाकांत भगत (आकेरी) , सावित्री लक्ष्मण गावकर (झाराप), सुभद्रा कृष्णा घाटकर (साळगाव- घाटकरनगर) या लाभार्थ्यांचा समावेश आहे. भगवान राघोबा कोंडुरकर (बिबवणे) यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.