जिल्हा परिषद समोर केले ठिय्या आंदोलन..
सिंधुदुर्गनगरी ता ५
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एप्रिल २०२५ पासूनचे थकीत वेतन आणि मागील १० महिन्यांची फरकाची रक्कम तत्काळ मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषद भवनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३४ ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या ७५४ कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२५ पासून वेतन मिळालेले नाही. तसेच १ सप्टेंबर २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीतील सुधारित किमान वेतनातील १० महिन्यांची फरकाची रक्कम मिळालेली नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज काम बंद ठेवून जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद भवनासमोर आंदोलन केले. जिल्हा परिषद कडे निधी उपलब्ध झाला असतानाही तो देण्यास विलंब केला जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेली कित्येक महिने वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी आज जिल्हा परिषदसमोर जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत कर्मचारी एकवटले होते. तर जोपर्यंत वेतन देण्याची हमी प्रशासनाकडून दिली जात नाही तोपर्यंत येथून जाणार नाही असा पवित्रा घेतला होता.
मात्र याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तसेच वेतनातील फरकाची रक्कम शासनाकडून प्राप्त झाली असून त्याचे वितरण सुरू असल्याचे म्हटले होते. मात्र अद्यापही एकाही कर्मचाऱ्याच्या खात्यात वेतनाची किंवा फरकाची रक्कम जमा झाली नसल्याने आज आंदोलनासाठी कर्मचारी एकवटले होते. दर महिन्याला वेतनासाठी पाठपुरावा करावा लागतो. पाठपुरावा केल्याशिवाय वेतन मिळत नाही असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. तरी प्रशासनाने प्राप्त झालेला निधी तत्काळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी लावून धरली होती.
अखेर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वतीने मागील ३ महिन्यांचे थकीत वेतन येत्या १२ ऑगस्ट पर्यंत तर फरकाची ४ कोटी ६४ लाख ६० हजार ५५४ एवढी रक्कम येत्या दोन दिवसात प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यावर वर्ग केली जाईल असे लेखी पत्र ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेला दिल्याने आजचे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ परब, सचिव अभय सावंत, हनुमंत चव्हाण, संदीप सावंत, बाबू घाडी, मनोज सावंत यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.