विनापरवाना बंदूक प्रकरणी अजून काहीजण पोलिसांच्या टार्गेट वर…

बंदुका घेतलेल्यांचीही झाली चौकशी..

⚡कुडाळ ता.०५-: तालुक्यातील मोरे येथील बंदुका बनवण्याच्या कारखान्यात अजून किती बंदुका तयार करण्यात आल्या, कोणाला देण्यात आल्या व यात कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास कुडाळ पोलीस कसोशीने करीत आहेत. उद्या अजून काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. सोमवारी पाच संशयित आरोपींना पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर आज कुडाळ पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली. यात अजून कोणा कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत असून या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बंदुका कोणाकोणाला वितरित करण्यात आल्या याची माहिती पोलीस घेत आहेत.
माणगाव खोऱ्यातील मोरे येथे एका फॅब्रिकेशनच्या सेंटर मध्ये बंदुका बनविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकून बंदुकांसह काही लोकांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी पूर्ण माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.
   याप्रकरणी पोलिसांनी शांताराम दत्ताराम पांचाळ (४२,मोरे मधली वाडी,या.कुडाळ), आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (३२,रा. माणगांव,या.कुडाळ), यशवंत राजाराम देसाई (५८ वाणेगल्ली, आजरा, जि..कोल्हापुर), प्रकाश राजाराम गुरव (वय ४०, रा.आजरा, जि.कल्हापुर) व सागर लक्ष्मण घाडी (मालवण नांदरुख) या पाच जणांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले होते. कुडाळ न्यायालयाने त्यांना ७ ऑगस्ट पर्यंत म्हणजे तीन दिवस पोलीस कोठडी दिली होती.
आज पाचही संशयित आरोपीकडे
पोलीसांनी चौकशी केली. ज्यांना बंदुका दिल्यात त्यांची नांवे सांगितल्यावर अशा लोकांना पोलीसांनी बंदुका घेऊन चौकशीला बोलविले होते. त्यांच्या कडे चौकशी करण्यात येत होती. सकाळ पासून लोकांची कुडाळ पोलीस ठाण्यात वर्दळ दिसत होती. तेव्हा का बंदुक घेतलेलात, काय नवीन, अशी विचारणा मित्र मंडळी एकमेंकांना करताना दिसून येत होती.
याबाबतचा अधिक तपास कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अनिरूद्ध सावर्डे करीत आहेत.

You cannot copy content of this page