⚡बांदा ता.०१-: डेगवे–तांबोळी मार्गावर वन खात्याच्या मालकीतील रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. अवघ्या 280 मीटर अंतराच्या या फॉरेस्ट रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने तांबोळी, असनीये, घारपी, फूकेरी, झोळंबे, भालावल, कोनशी, नांगरतास, दाभील या गावातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
हा रस्ता विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी सर्वात जवळचा व सोयीस्कर मार्ग असूनही, त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा संताप ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेवरून काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर थोडीशी मलमपट्टी करण्यात आली होती, मात्र ती तात्पुरती ठरली असून सध्या रस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षाही बिकट झाली आहे.
दररोज या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहने घसरून लहान-मोठे अपघात घडत आहेत. तरीदेखील, प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. “कुणाचा तरी जीव गेला तरच हालचाल होणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना, या गंभीर प्रश्नाकडे संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा ग्रामस्थांचा रोष व्यक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डेगवे–तांबोळी फॉरेस्ट रस्त्यावरील ‘खड्ड्यांचा वनवास’ अखेर कधी संपणार, हा प्रश्न आता ग्रामस्थांच्या ओठांवर आहे.
डेगवे-तांबोळी मार्गावरील फॉरेस्ट रस्ता झाला खड्डेमय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास…
