⚡बांदा ता.३०-:
बुधवारी संपूर्ण दिवसभर मडूरा पंचक्रोशीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. कास – वरचा मांगरवाडी येथील सीताबाई रामा पंडित यांच्या घरावर आंब्याचे महाकाय झाड पडून नुकसान झाले. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सीताबाई या किचनमध्ये जेवण बनवत असताना त्याच ठिकाणी आंब्याचे झाड कोसळले. या दुर्घटनेतून त्या बालंबाल बचावल्या.
गुरुवारी सकाळी कास सरपंच प्रवीण पंडित यांनी नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासमवेत तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबू पंडित, पोलीस पाटील प्रशांत पंडित उपस्थित होते. दुपारी तलाठी श्रीमती कांबळी यांनी नुकसानीचा पंचनामा केला. या दुर्घटनेत सीताबाई पंडित यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच प्रवीण पंडित यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे.
