⚡बांदा ता.३०-: येथील बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्था मर्यादित, बांदा यांनी सालाबादप्रमाणे यंदाही दूध उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 9 लाख 61 हजार 807 रुपये इतका बोनस वितरित केला आहे. हा बोनस दूध पुरवठ्याच्या 10 टक्के प्रमाणात देण्यात आला असून, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामध्ये प्रथम क्रमांकाचे दूध पुरवठादार शेतकरी जयदीपक गवस यांना 85 हजार 970 रुपये, द्वितीय क्रमांकाचे शेतकरी सत्यवान परब यांना 63 हजार 062 रुपये, तृतीय क्रमांकाचे शेतकरी रुपेश माजगावकर यांना 60 हजार 985 रुपये, चतुर्थ क्रमांकाचे शेतकरी उदय परब यांना 42 हजार 683 रुपये तर पाचव्या क्रमांकाचे शेतकरी समीर पेळपकर यांना 42 हजार 384 रुपये इतका बोनस वितरित करण्यात आला. सर्व शेतकऱ्यांचा बोनस त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खात्यात जमा करण्यात आला. तसेच सभासदांना 10 टक्के लाभांश (डिव्हिडंड) म्हणून 47 हजार 700 रुपये वितरित करण्यात आला. संस्थेचे सचिव आणि संकलक यांना प्रत्येकी एक महिन्याचा पगार बोनस देण्यात आला.
संस्थेचा गौरवशाली प्रवास
१३ जानेवारी १९८४ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेला यंदा ४१ वर्षे पूर्ण झाली असून, संस्थेची स्वतःची इमारत आहे आणि संपूर्ण कामकाज संगणकीकृत आहे. सध्या संस्थेत ३८२ सभासद असून, रोजचे दूध संकलन ६५० ते ७०० लिटर आहे. हे संकलन वाढवून १,००० लिटरपेक्षा जास्त नेण्याचा संस्थेचा संकल्प आहे.
गेल्या काही वर्षांत संस्थेने गोकुळ दूध संघास दूध पुरवठा सुरू केल्यामुळे, विक्री करून उरलेल्या दुधाची समस्या सुटली. शासनाने दूध घेणे बंद केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक संस्था बंद पडल्या, मात्र बांदा दूध संस्थेने योग्य नियोजन, कार्यतत्पर संचालक मंडळ आणि सभासदांचा विश्वास यांच्या जोरावर आपले कामकाज सातत्याने सुरू ठेवले. सन २०१८ पासून संस्थेचे चेअरमन नारायण गायतोंडे व त्यांच्या संचालक मंडळाने संस्थेचे कामकाज उत्तमरीत्या सांभाळले आहे. संस्थेचे सचिव दीपक चव्हाण हे गेली २१ वर्षे सेवा देत असून, संकलक सौ. गौरी सावंत यांनी देखील अनेक वर्षे उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संस्था दूध उत्पादक सभासदांना 5,000 ते 50,000 पर्यंत कर्ज केवळ दोन जामिनदारांच्या हमीवर देते. कर्ज प्रक्रिया सुलभ असल्याने शेतकऱ्यांना एकाच दिवसात कर्ज मंजूर होते.
वर्षनिहाय बोनस वितरण
2018-19 मध्ये 3,34,118 रुपये, 2019-20 मध्ये 3,55,789 रुपये, 2020-21 मध्ये 4,88,794 रुपये, 2021-22 मध्ये 6,78,281 रुपये, 2022-23 मध्ये 9,60,688 रुपये, 2023-24 मध्ये 6,33,383 रुपये, 2024-25 मध्ये 9,61,807 रुपये बोनस वितरित करण्यात आला.
गेल्या आर्थिक वर्षात संस्थेचे दूध संकलन एक कोटीच्या वर गेले असून, चालू वर्षात हे संकलन आणखी वाढवण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.
यावेळी चेअरमन नारायण गायतोंडे, व्हाईस चेअरमन रुपेश माजगावकर, संचालक राजेश पावसकर, समीर पेळपकर, प्रमोद देसाई, बापू आईर, सौ. यशोदा सावंत, जयदीपक गवस, लवू जाधव, सचिव दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा येथे शेतकऱ्यांना बोनस वितरित करताना मान्यवर.
