⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी येथील आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय इंटरस्कूल नेमबाजी स्पर्धेत १९ वर्षाखालील गटातील १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
राज्यातील विविध शाळांमधून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये आयुषने उत्कृष्ट नेमबाजी कौशल्य दाखवत सर्वांना प्रभावित केले. त्याच्या अचूक नेमबाजीमुळे त्याने प्रथम क्रमांक मिळवून सावंतवाडीचा लौकिक वाढविला आहे.
आयुषच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक, प्रशिक्षक तसेच मित्रपरिवार आणि नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले असून, पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
