रुपेश राऊळ यांचा आरोप:राजघराण्याबद्दल आम्ही कायमच आदर ठेवतो. मात्र निवडणुका हे शेवटी राजकारण आहे..
⚡सावंतवाडी ता.२१-: जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार, खासदार हे आज जिल्ह्यातील विकासाकडे दुर्लक्ष करत आहेत. जनतेच्या प्रश्नांत त्यांना गांभीर्यच राहिले नाही. लोकप्रतिनिधी म्हणून विकासाचा विसर त्यांना पडला आहे, हे मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज मंगळवारी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.
श्री. रुपेश राऊळ म्हणाले, सत्ताधारी आज समाजात जातीय तेढ निर्माण करत आहेत. आमच्याबरोबर सत्येत असताना मोठा भाऊ कोण म्हणून हे टीका करायचे. सत्ताधारी आज आपली वैयक्तिक पावर दाखवत आहेत. विकासाची मात्र बोंबाबोंब आहे. येथील विकास बोंबलला आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा पूर्णपणे कोलमडली असून बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. सत्ताधारी कार्यकर्त्यांचे प्रवेश घेण्यावर आपला वेळ फुकट घालवत आहेत. विकासावर ते काही बोलत नाहीत. मात्र जेथे वाद निर्माण होतात तेथे सत्ताधारी लोकप्रतिनिधी प्रथम पोहचतात. आपले पालकमंत्री दोडामार्ग येथील प्रकरणात रस्त्यावर उतरले ही आज लोकशाहीची शोकांतिका आहे. युवकांना रोजगार देण्याऐवजी जातीय वादात युवकांना संधी दिली जात आहे, ही बाब गंभीर आहे. लोकशाही मोडीत काढून शिंदे गट स्थापन झाला. येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये जनताच यांना उत्तर देईल असे रुपेश राऊळ म्हणाले.
राज घराण्याची युवराज्ञी सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. याबाबत विचारले असता रुपेश राऊळ म्हणाले सावंतवाडी राजघराण्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्या कोणत्या पक्षा मार्फत निवडणूक लढवणार हे महत्त्वाचे आहे. राजघराण्याबद्दल आम्ही कायमच आदर ठेवतो. मात्र निवडणुका हे शेवटी राजकारण आहे वेळ येईल तेव्हा पाहूया असे राऊळ म्हणाले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकात कासार, शहर संघटक निशांत तोरस्कर, उपतालुकाप्रमुख बाळू माळकर, शिवदत्त घोगळे आदी उपस्थित होते.
