भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग”च्या स्थापनेने कलाकारांमध्ये उत्साहाची लाट…

⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी परंपरेचा गौरव जपण्यासाठी आणि कलाकारांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” ही संस्था नुकतीच अधिकृतरीत्या नोंदणीकृत झाली आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संस्थेचे मुख्य उद्दिष्टे अत्यंत व्यापक असून त्यात भजनी कलाकारांना शासनस्तरावर अनुदान उपलब्ध करून देणे, “स्वातंत्र्य भजन सदन” उभारणे, शासकीय ओळखपत्रांची व्यवस्था, शाळांमध्ये संगीत शिक्षकांची नेमणूक, बाल भजन शिबिरे, जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण, संगीत वाद्यांची उपलब्धता आणि भजन स्पर्धांसाठी एकसंध नियमावली तयार करणे यांचा समावेश आहे.

संस्थेने भजनी कलेच्या संवर्धनासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपक्रम राबविण्याचा निश्चय केला आहे.संस्थेचे अध्यक्ष बुवा श्री. संतोष कानडे, सचिव बुवा श्री. गोपीनाथ लाड आणि खजिनदार श्री. सतीश रावराणे यांच्या नेतृत्वाखाली संस्था कार्यरत आहे. या तिन्ही पदाधिकाऱ्यांच्या दूरदृष्ट विचारसरणीने आणि कलाकारांविषयीच्या समर्पणाने संस्थेची दिशा आणि कामकाज अधिक प्रभावी झाले आहे.

संस्थेचा पहिला अधिकृत कार्यक्रम मळगाव येथील पेडणेकर हॉलमध्ये पार पडला. या छोटेखानी पण उत्साही सोहळ्यात संस्थेची ओळख, उद्दिष्टे आणि आगामी कार्ययोजना सादर करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान भजनी कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या समाधानासाठी खुली चर्चा घेण्यात आली.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रमोदजी कामत, प्रेमानंद देसाई, संदीप नाईकधुरे, ज्ञानेश्वर मिस्त्री, हेमंत तवटे, कृष्णा राऊळ, दीपक पाळेकर, राजा सामंत, बाळू कांडरकर, सुरेश गावडे, नितीन नाईक, रुपेंद्र परब तसेच मळगाव ग्रामपंचायत सरपंच हनुमंत पेडणेकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी संस्थेच्या पुढाकाराचे अभिनंदन केले आणि शासनस्तरावर आवश्यक पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

भजनी कला ही आपल्या लोकसंस्कृतीचा आत्मा आहे, आणि ही संस्था त्या आत्म्याला नवा प्राण देत असल्याचे सर्व उपस्थितांनी गौरवपूर्वक नमूद केले. “भजन हे केवळ गाणे नाही, ती एक साधना आहे,” या भावनेतून कार्यरत असलेली भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कलाकारांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरत आहे.भविष्यात जिल्ह्यातील भजनी कलाकारांना सामाजिक आणि शासकीय ओळख प्राप्त करून देत, या लोककलेला योग्य प्रतिष्ठा मिळवून देण्याची अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page