एलईडी लाईट शोद्वारे सिंधुदुर्ग किल्ला झळाळून निघणार…

तारकर्लीत पर्यटन उद्यान होणार:बाबा मोंडकर यांची माहिती..

⚡मालवण ता.१७-:
सिंधुदुर्ग किल्ला येथे एलईडी लाईट शो तसेच परिसर सुशोभीकरण करण्यात येणार असून किल्ल्याच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे. एलईडी लाईट शो माध्यमातून रात्रीच्या वेळी किल्ला उजळून निघणार आहे. तसेच तारकर्ली येथे पर्यटन उद्यान निर्मिती होणार आहे. या दोन्ही कामांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांनी १० कोटी १२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजपा मालवण शहर तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी बाबा मोंडकर यांच्यासह सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, बाबा परब, बबलू राऊत, पंकज सादये, भाई कासवकर, अशोक तोडणकर, मोहन वराडकर, आबा हडकर, ललित चव्हाण, रोहन पेंडूरकर, सन्मेष परब, पंकज पेडणेकर, नीलम पांजरी, सेजल परब, ममता वराडकर, पूजा करलकर, शर्वरी पाटकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, अमिता निवेकर, चित्रा हरमलकर, राणी पराडकर, साक्षी आईर, मयुरी दाभोलकर, दीपाली वायंगणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नगरपरिषद २०२५ चे आरक्षण जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भाजपच्या ध्येयाने वाटचाल सुरू केली आहे. आरक्षित झालेले दहा प्रभाग आणि नगराध्यक्ष पदासाठीच्या आरक्षणाचा विचार करून वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रभाग रचनेमध्ये प्रभाग प्रमुख, आवश्यक बुथ अध्यक्ष यांची नियुक्ती तसेच आवश्यक पदांची फेरनियुक्ती करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आणि ज्येष्ठ पदाधिकारी १०० टक्के तयारीने मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी सज्ज झाले असून जनतेला सोबत घेऊन विकासाचे ध्येय ठेवून पुढे जात आहोत. मालवण नगरपरिषद निवडणुकीत भाजप १०० टक्के प्लस दिसेल, असा विश्वास बाबा मोंडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

पर्यटन आणि रोजगार हे एकमेकांना पूरक विषय असून सरकारमधील भाजपचे नेते पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून होत असलेल्या रोजगारभिमुख आणि ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या कामांमुळे येणाऱ्या मालवण नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जनता भाजपच्या बाजूने राहील, असा विश्वासही मोंडकर यांनी व्यक्त केला.

पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची डागडुजी व्हावी, पर्यटनपूरक कामे व्हावीत, अशी शिवप्रेमी आणि पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या किल्ले प्रेरणोत्सव समिती, टीटीडीएस, पर्यटन व्यवसाय महासंघ अशा अनेक संस्थांची मागणी होती. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग मालवण किल्ल्यावर एलईडी लाईट शो सुरू करण्याची मागणी होती. या कामाची सुरुवात राज्याचे भाजप अध्यक्ष आणि माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात झाली होती. सध्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग मालवण किल्ला एलईडी शो आणि सुशोभीकरणासाठी ७ कोटी १२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील किल्ल्यासाठी पर्यटनांतर्गत मिळालेला हा सर्वात मोठा निधी आहे. या प्रकल्पांतर्गत दांडेश्वर मंदिरापासून मच्छीमारांना अडथळा आणणारी पद्मगडहून गेलेली वीजवाहिनी हटवून मोठे पोल लावण्याचे काम तसेच जेटीच्या दोन्ही बाजूंनी एलईडी लाईट्स लावण्याचे काम सुरू झाले आहे. हा सर्वात मोठा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन येणाऱ्या वर्षात जनतेसाठी आणि पर्यटकांसाठी खुला होईल. यामुळे संध्याकाळच्या वेळी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व पर्यटकांना दिसेल. तसेच तारकर्ली येथील शासकीय जागेमध्ये पर्यटन पूरक उद्यान विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सरकारी जागेचे मॅपिंग व पाहणी झाली असून शासनाने या उद्यानासाठी तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. या दोन्ही प्रकल्पांसाठी साधारण दहा कोटी बारा लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या विकासकामांच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेवा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आणि स्थानिक रोजगारात वाढ करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे श्री. मोंडकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page