मंगेश तळवणेकर:मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर..
सावंतवाडी ता.१७-: सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केल्यानंतर, महाराष्ट्र शासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याबद्दल शिक्षक वर्गामध्ये असंतोष वाढला आहे. या विषयावर लक्ष वेधण्यासाठी श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश लक्ष्मण तळवणेकर यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून टीईटी सक्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.
आहे.तळवणेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टीईटी परीक्षेचा निकाल केवळ तीन टक्के इतकाच लागतो. त्यामुळे अनेक शिक्षक मानसिक तणावाखाली आहेत आणि काहींनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. “शेतकऱ्यांप्रमाणेच आता शिक्षक वर्गही संकटात सापडला आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.सदर पत्रात असेही म्हटले आहे की, 2010 पूर्वी सेवेत आलेले शिक्षक शासनाच्या तत्कालीन नियमांनुसार पूर्ण पात्रता घेऊन काम करत आहेत. सेवा शर्ती नियमावली 1981 मध्ये टीईटीबाबत कोणतीही तरतूद नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. तळवणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा लक्षात घेऊन या जिल्ह्यात टीईटीची सक्ती न लावता दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.ते पुढे म्हणाले की, “राज्यभरातील जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत, आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षण अत्यंत महाग झाले आहे. शिक्षकांवरील अन्यायकारक परीक्षा सक्तीमुळे सरकारी शिक्षण व्यवस्थेवर संकट येईल.” त्यांनी शासनाला या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात नामांकित वकील नेमून पूर्ण ताकदीने लढा देण्याचे आवाहन केले आहे.या विषयावर शिक्षक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनीही एकत्र येऊन सरकारी शाळांचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही तळवणेकर यांनी केले आहे.
